ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर ज. जी. हॉस्पिटल रुग्णालयात हृदय, किडनी व लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सर ज. जी. हॉस्पिटल रुग्णालयाचे राज्यात मोठे नाव आहे. या रुग्णालयात हृदय, किडनी व लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी रुग्णालयास आवश्यक साधन सामग्री उपलब्ध दिली जाईल. तसेच सर ज. जी. समूह रुग्णालयातील सर्वच वॉर्डचे नूतनीकरण करावे, यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

ग्रेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ११ कोटी ७४ लाख किमतींच्या कामांचे उद्घाटन आणि २०५ कोटी २४ लाख रुपये किमतीच्या कामांचे ई- भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालयात ईएनटी विभाग, औषध वैद्यकशास्त्र, अस्तिव्यंगोपचार कक्ष, बालरोगचिकित्सा कक्ष, फिजियोलॉजी लेक्चर हॉलचे उद्घाटन आणि महाविद्यालयात नव्याने बांधण्यात येणाऱ्या व नूतनीकरण करण्यात येणाऱ्या इमारतीच्या कामांचा समावेश आहे.

या कार्यक्रमास आमदार मनीषा कायंदे, अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे आयुक्त राजीव नीवतकर, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. अजय चंदनवाले आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक यंत्रसामग्री व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. रुग्णालयात येणाऱ्या सामान्य माणसाला उत्तम प्रकारचे उपचार मिळावेत, यासाठी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका यासह सर्वच घटकांनी शासनाच्या आरोग्य योजनांचे दुत आपली सेवा बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणारा रुग्ण हा सामान्य वर्गातील असतो. त्याला रुग्णालयात आपुलकीची वागणूक व सेवा मिळावी. राज्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्याबाबत शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व जिल्ह्यात अशी रुग्णालये उभारण्यात येणार येतील. या सुविधांमुळे जटिल आजारांवर अधिक प्रभावी उपचार होऊ शकतील. नागपूर विभागातील शासकीय महाविद्यालयांमध्ये पीपीपी तत्त्वावर एमआरआय, सिटीस्कॅन सेवा सुरू करण्यात येणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. याठिकाणी सुरू असलेल्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. अशा सूचनाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अवयवदान चळवळीमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे असून मेंदू मृत (Brain Dead) झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकाला अवयवदानाचे महत्त्व पटवून द्यावे, असेही मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले.

आमदार मनीषा कायंदे, अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंडनवाले यांनी मनोगत व्यक्त केले. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी प्रास्ताविक केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमात अवयवदान कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल डॉ. व्हर्नन वेल्हो, एका आठवड्यात दोन मुत्र प्रत्यारोपण यशस्वीपणे केल्याबद्धल यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अमोल कांबळे, नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. गीता सेठ, सीव्हीटीएस विभाग प्रमुख डॉ. आशिष भिवापूरकर यांच्यासह डॉ. गजानन चव्हाण, डॉ. संजय सुरासे, डॉ. अरुण राठोड, डॉ. पूनम जैस्वाल, डॉ. चित्रा सेल्वराज, सुनील पाटील, राजेंद्र पुजारी, श्रीमती योजना बेलदार श्री. नितीन नवले, सखाराम धुरी, सुरेंद्र शिंदे यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks