करवीर : वडकशिवाले येथे उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

वडकशिवाले (ता. करवीर) येथे उसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली सापडून बाबूराव शिवराम कांबळे (वय ५१, रा. इस्पुर्ली, ता. करवीर) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद इस्युर्ली पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे.
याबाबत पोलिस व ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी, आज दुपारी एकच्या सुमारास उसाने भरलेला ट्रॅक्टर वडकशिवाले फाट्यावरून वडकशिवाले गावाकडे येत होता. मध्येच असणाऱ्या ओढ्याच्या पुलाजवळ आला असता ट्रॅक्टरचालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर उसाच्या ट्रॉलीसहित रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीवर उलटला. यामध्ये दुचाकीस्वार बाबूराव कांबळे उसाच्या खाली दबले गेले.
अपघाताच्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी त्यांना बाहेर काढत कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत कांबळे हे कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्याच्या आरोग्य विभागात कार्यरत होते. रविवारी साप्ताहिक सुटी निमित्ताने ते घरी होते.किरकोळ खरेदीसाठी ते बाचणी येथे गेले होते. परत येत असताना वडकशिवाले येथे हा अपघात झाला.
ट्रॅक्टर चालक प्रदीप तानाजी पाटील (रा. म्हाळुंगे, ता. करवीर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.