उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीकडून अटक

लघु पाटबंधारे विभागाच्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अंतर्गत केलेल्या कामाचे बील काढून दिल्याच्या मोबदल्यात 19 हजार 500 रुपयांची लाच घेताना पंचायत समिती शहादा येथील कनिष्ठ अभियंता, अतिरिक्त कार्यभार उपविभागीय जलसंधारण अधिकारी याला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.25) नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ केली.
कनिष्ठ अभियंता, अतिरिक्त कार्यभार उपविभागीय जलसंधारण अधिकारी दिनेश केशवराव पाटील (वय-51) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत शहादा येथील 22 वर्षाच्या व्यक्तीने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार तक्रार केली आहे.
तक्रारदार यांनी ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत,शहादा तालुक्यात तीन कामे पूर्ण केली आहेत. तिन्ही कामांची रक्कम/बील काढून दिल्याच्या मोबदल्यात, दिनेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे 95 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यापैकी वेळोवेळी 75 हजार दिनेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून या आधीच घेतली आहे. उर्वरित 20 हजार रुपयांसाठी पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला होता. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली.
नंदुरबार एसीबीच्या पथकाने 20 सप्टेंबर रोजी पंचासमक्ष पडताळी केली असता दिनेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 19 हजार 500 रुपये स्वीकारण्याचे पंचासमक्ष कबूल केले. त्यानुसार सोमवारी नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये सापळा रचण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना दिनेश पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले.