मुरगूड : शिवराजच्या शिवानी मेटकर आणि गौरी पाटीलची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड : विभागीय स्पर्धेत तन्वी मगदूमला रौप्यपदक

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील कला शाखेच्या विद्यार्थीनी आणि लोकनेते सदाशिवराव मंडलिक साई कुस्ती आखाड्याच्या महिला मल्ल शिवानी बिरू मेटकर आणि गौरी मधुकर पाटील यांची राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या शालेय महिला फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये शिवराजच्या तन्वी मगदूमला रौप्य पदक प्राप्त झाले.
बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षाखालील वयोगटामधील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये ‘शिवराज’च्या शिवानी मेटकरीने पहिल्या लढतीत लातूरच्या धनश्री तळेकरला १०- ० गुणफरकाने पराभूत करून विजयी सलामी दिली. औरंगाबादच्या पूजा मुंडेला पराजित करून उपांत्य सामन्यात नाशिकच्या ज्ञानेश्वरी लोंढेला चित केले. अंतिम लढतीच्या वेळी पुण्याच्या रेश्मी चव्हाणला चित करून राष्ट्रीय स्पर्धेसाठीचे तिकीट बुक केले.
‘शिवराज’च्याच गौरी पाटीलने उज्वला कराडकर (नागपूर)ला पराभूत करून पुढच्या फेरीत श्रुती येवले (पुणे )ला हरवून अंतिम लढतीत औरंगाबादच्या रूपाली शिंदेला १०- ० गुणफरकाने एकतर्फी मात करत राष्ट्रीय स्पर्धेस पात्र ठरली.
शिवराजच्या तन्वी मगदूमने शमिका पलंगे (औरंगाबाद) हिला पराभूत करुन आगेकूच केली. पुढच्या लढतीत नागपूरच्या अक्षया उतकरीला आसमान दाखवले. मात्र अंतिम लढतीत लातूरच्या आरती स्वामी बरोबर चिवट झुंज देताना तिला रौप्यपदावर समाधान मानावे लागले.
या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासो लवटे, सुखदेव येरुडकर (वस्ताद), दयानंद खतकर, सागर देसाई यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे सेक्रेटरी खासदार संजय मंडलिक, विश्वस्त विरेंद्र मंडलिक, साईचे राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण, कार्यवाह आण्णासो थोरवत, डॉ. प्रशांत आथणी, प्राचार्य पी. डी. माने, उपप्राचार्य एल. व्ही. शर्मा, क्रीडाशिक्षक प्रा. रवींद्र शिंदे, तालुका समन्वयक एकनाथ आरडे व वर्गशिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले.