मुदाळ येथे १०० बेडचे सर्व सोयींनीयुक्त मोफत जम्बो कोवीड सेंटर सुरू करणार ; गोकुळचे नूतन संचालक रणजीतसिंह पाटील यांची माहिती

भुदरगड प्रतिनिधी : प्रकाश पाटील
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितसिंह पाटील युवा शक्तीच्या माध्यमातून मुदाळतिट्टा येथील के .पी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये शंभर बेडचे सर्व सोयीनियुक्त मोफत सेंटर जम्बो सेंटर सुरू करणार असल्याची माहिती गोकुळ दूध संघाचे नूतन संचालक रणजीतसिंह पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात गेले अनेक दिवस कोरोनाचा फैलाव वाढत आहे. उपचार वेळेत होत नसल्याने अनेक जण या आजाराशी झुंजत आहेत. या आजारामुळे काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुदाळतिट्टा येथे के. पी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये १०० बेडचे जम्बो सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना लागणाऱ्या संपूर्ण वैद्यकीय सेवा आणि औषधे मोफत दिली जाणार आहेत तसेच जेवण आणि नाश्त्याची मोफत सुविधा केली आहे. रुग्णांच्या मानसिक आधारासाठी मोफत समुपदेशन व रुग्णांना वाचन करण्यासाठी ग्रंथालयाची सोय, वाय फाय व टीव्ही ची सुविधा देखील मोफत दिली जाणार आहे. कोवीड कुटुंबासाठी स्पेशल मोफत सुविधा व महिलांसाठी स्वतंत्र सुविधा दिल्या जाणार आहेत ज्या रुग्णांना सेवा घ्यावयाची अथवा मदत द्यावयाची आहे त्यांनी रणजीतदादा युवाशक्ती कोवीड सेंटर मारुती पाटील ९४२३८२५७५० व महादेव पाटील ९४२३२७८२४५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.