सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात जागतिक जलनिमित्त पोस्टर प्रदर्शन स्पर्धा संपन्न

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिव मंडलिक महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभाग व पर्यावरण संसाधन केंद्र अर्थात ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 22 मार्च 2024 रोजी जागतिक जलदिनानिमित्त “पाणी बचत” या विषयावर पोस्टर प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या. पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्याच्याशिवाय सजीव प्राणी, झाडे यांचा विनाश होईल. त्यामुळेच ‘जल है तो जीवन है’ असे मानले जाते.
आपल्या जीवनात म्हणूनच पाण्याचे महत्व मोठे आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, सर्व नैसर्गिक स्त्रोतांचा अतिवापर आणि शोषणामुळे मानवाला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. हे संकट भविष्यात आणखी वाढू शकते. पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने पाण्याचे महत्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्तता याविषयी जागृत करण्यासाठी जगभरात दरवर्षी 22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो.
याच जागतिक जलदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये विविध पोस्टर माध्यमातून पाणी बचतीसाठी संदेश देण्यात आला. यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पोस्टर तयार करून आणले. यामध्ये प्रामुख्याने पाणी बचतीचे उपाय, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी प्रदूषण, जलसंवर्धन इत्यादी विषयाच्या अनुषंगाने चित्रमय पोस्टरचे प्रदर्शन भरण्यात आले.
सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक उपक्रम समन्वय प्रा. डी.ए. सरदेसाई यांनी केले. सदर पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कुंभार सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थिती विद्यार्थ्यांना पाणीबचत या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले .
तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील सर यांनी जल है तो कल है या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. के .एस. पवार, प्रा. प्रशांत कुचेकर, प्रा .डॉ. गुरुनाथ सामंत, प्रा. डी.व्ही. गोरे, प्रा. दयानंद कांबळे, प्रा. राम पाटील सर इत्यादी प्रमुख उपस्थित होते. तसेच सदर उपक्रमाला सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर पोस्टर स्पर्धेचे परीक्षण प्रा.सौ. कुंभार मॅडम व प्रा.सौ. कांबळे मॅडम यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार कॉमर्स विभागाचे प्रमुख डॉ.एम. ए.कोळी यांनी मांडले.
पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे-
1. प्रथम क्रमांक- सानिका शिवाजी पाटील
2. द्वितीय क्रमांक -अजिंक्य तानाजी कांबळे
3. तृतीय क्रमांक- सुप्रिया संजय तांबेकर बी.ए. भाग 2 व वैष्णवी बाजीराव कुंभार बी.कॉम. भाग 1 विभागून देण्यात आला.
4. तसेच कु. प्रतीक्षा राजेंद्र पाटील व कु.धनश्री प्रवीण पवार यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले .