शाहूचे ” शाहू समृद्ध सेंद्रिय खत ” शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल : राजे समरजितसिंह घाटगे; कारखाना उत्पादित शाहू समृद्ध सेंद्रिय खताचा विक्री शुभारंभ

कागल प्रतिनिधी :
रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यासाठी यापुढे सेंद्रिय खतांचा वापर अनिवार्य आहे.शेतकऱ्यांची ही गरज ओळखून शाहू साखर कारखान्याने शेती विभागाच्या देखरेखीखाली शाहू समृद्ध सेंद्रिय खत तयार केले आहे. जमिनीचा पोत सुधारुन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी हे खत शेतकऱ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल. असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
कोविड पाश्वभूमीवर कारखान्याचे मुख्य कार्यालयात चेअरमन श्री घाटगे यांच्या हस्ते शाहू समृद्ध सेंद्रिय खताचा विक्री शुभारंभ पार पडला.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, संचालक युवराज पाटील, बॉबी माने, सचिन मगदूम,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, शेती अधिकारी रमेश गंगाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. घाटगे पुढे म्हणाले,शाहू साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी शाहू साखर कारखान्यामध्ये सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन प्रयोग यशस्वीपणे राबवण्याची परंपरा निर्माण केली आहे.शाहू साखर कारखाना सभासद शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी ऊस विकास योजनांचा धडक कार्यक्रम गेली ३५ वर्षापासून राबवत आहे.त्या अंतर्गत खते, बियाणे, कीटकनाशके, औषधे यांच्यासह कारखाना उत्पादित कंपोस्ट खत, गांडूळ खत,शाहू ह्युमीफॉस आदींचा पुरवठा केला जात आहे. त्याचा सभासद शेतकऱ्यांना लाभही होत आहे.स्व.राजेंच्या पश्चात या सेंद्रिय खताच्या उत्पादनाच्या निमित्ताने या परंपरेमध्ये भर पडत आहे. हे शाहू परिवारासाठी अभिमानास्पद आहे. असेही ते म्हणाले
प्रास्ताविकपर मनोगतात ऊस विकास अधिकारी के बी पाटील म्हणाले शाहू समृद्ध सेंद्रिय खतामध्ये जमिनीसह पिकासाठी आवश्यक असलेले 13 प्रकारचे घटक समाविष्ट आहेत. या खताच्या वापरामुळे सर्वच पिकांना मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांसह जिवाणूंचा ही पुरवठा होतो. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांना उत्कृष्ट व खात्रीलायक सेंद्रिय खताची उपलब्धता होणार आहे. त्यामुळे रासायनिक खतांमध्ये 15 ते 20 टक्के पर्यंत बचत करता येईल.
शाहू कृषी संघाच्या शाखांमार्फत हे खत शाहूच्या सभासद शेतकऱ्यांना एकरी वीस बॅग प्रमाणे माफक दरामध्ये क्रेडिटवर पुरवठा केले जाईल.
एच.आर. मॅनेजर आभार बाजीराव पाटील यांनी आभार मानले.
ऊस विकास योजना अंतर्गत अनुदान चेक वाटप
या कार्यक्रमाचे औचित्य साधूनकारखान्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजना अंतर्गत विविध योजनेतील लाभार्थी सभासदांना प्रातिनिधीक स्वरुपात अनुदान चेक वाटप चेअरमन श्री.घाटगे यांच्या हस्ते केले. कोरोना संसर्ग परिस्थितीमुळे इतरवेळी एकत्रितपणे करण्यात येणारे अनुदान चेक वाटप कार्यक्रम न घेता उर्वरित सभासदांना विभागीय शेती कार्यालयामार्फत या चेकचे वाटप करण्यात येईल.असेही श्री. घाटगे यांनी स्पष्ट केले. 122 सभासद शेतकऱ्यांना 8 लाखाहून अधिक रकमेचे अनुदान स्वरूपात वाटप केले जाणार आहे.