वृक्षमित्र प्रविण सूर्यवंशी यांचा ‘वृक्षरक्षाबंधना ‘ चा उपक्रम समाजात पर्यावरण जागृती करणारा : संदीप घार्गे ; मुरगूड मध्ये २२५ वृक्षांना बांधल्या राख्या

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
वृक्षांप्रती बंधुभाव जोपासत वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी मुरगूडमध्ये गेल्या २० वर्षापासून चालू ठेवलेला वृक्षरक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम समाजात पर्यावरण जागृती करणारा असा आहे . असे प्रतिपादन मुरगूड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारीसो मा. संदीप घार्गे यांनी केले . ते मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व महिला निसर्ग मंडळ मुरगूड यांचे विद्यमाने आयोजित वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी को जी मा शि पतसंस्था मुरगूड शाखेचे मॅनेजर उदय पाटील हे होते .
गेले दोन तपांपेक्षा जादा काळ पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या सुर्यवंशी दांपत्याने वनश्री मोफत रोपवाटिका , वृक्षारोपण, वृक्षरक्षाबंधन , डोंगर माथ्यावर बियांची हवाई पेरणी असे उपक्रम सातत्यपूर्ण सुरु ठेवले आहे .
अत्यंत निस्वार्थी भावनेने सुर्यवंशी दांपत्याने पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ आपल्या जिवनाचा एक अविभाज्य भाग बनवली आहे
सरपिराजी रोड व बाजार पेठेतील सुमारे २२५ वृक्षांना यावेळी राख्या बांधून त्यांना औक्षण करण्यात आले .सरपिराजी रोड वरील बँक ऑफ इंडीयाच्या समोरील वृक्षास एक मोठी प्रतिकात्मक राखी बांधून उपक्रमाची सुरवात करण्यात आली .
मुख्याधिकारी घार्गे पुढे म्हणाले, पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून त्यासाठी प्रत्येकाने वृक्षांप्रती आदरभाव बाळगला पाहिजे . तरच खऱ्या अर्थाने पर्यावरण संवर्धनाची चळवळ यशस्वी होईल .
प्रास्ताविकात वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी म्हणाले, २००३ साला पासून ‘वृक्षरक्षाबंधन ‘ हा उपक्रम मुरगूड मध्ये सुरू केला आहे . समाजातील माता-भगिनिंच्या पासून आबालवृद्धांपर्यत साऱ्यांच्याच मनामध्ये वृक्षांप्रती आदर निर्माण व्हावा वृक्ष हे आपले संरक्षक बंधू आहेत ही भावना निर्माण करून पर्यावरण संवर्धनाची चळवळ पुढे नेणे हा या उपक्रमा मागील मुख्य हेतू आहे . गेले वीस वर्ष हा उपक्रम सातत्यपूर्ण सुरू असून पर्यावरण संवर्धन चळवळीतील कार्यकर्त्यांचा तो एक सण बनवून राहिला आहे .
या कार्यक्रमास महिला निसर्ग मंडळाच्या अध्यक्षा सौ निता सुर्यवंशी, माजी.नगरसेविका प्रतिभा सूर्यवंशी, माजी नगरसेविका सुजाता सुतार , अमृता सुतार , सरिता मांगले,विजया शिंदे, समिरा जमादार, वंदना वाडेकर, सौ जनाबाई देवडकर, सौ सुमन सुतार , स्मिता कमळकर, श्रीमती उज्वला शिंदे ,सौ छाया सुतार सौ. संगीता सुतार , सौ .ज्ञानेश्वरी टिपुगडे , वनश्री सुर्यवंशी, श्रृती कमळकर, , अनिता मेटकर, शांताबाई भोई यांच्यासह , वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी,अमर कांबळे , प्रकाश गोधडे, प्रदिप सुर्यवंशी ,बाळासाहेब गुरव, सिकंदर जमादार मृत्युंजय सुर्यवंशी, आदित्य बरकाळे आदी या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. स्वागत वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले तर आभार सिकंदर जमादार यांनी मानले .