ताज्या बातम्यामहाराष्ट्र

……तर महालक्ष्मी मंदिराजवळील सर्व व महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणे काढा ; कोल्हापुरात मनसेची मागणी

कोल्हापूर :

महालक्ष्मी मंदिरालगत काल चप्पल स्टँड हटवण्याची मोहीम राबविल्याने त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. गेले सुमारे १५ वर्षे असलेले एका कुटुंबाचे स्टँड महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करून काढले. त्यांना मंदिराजवळ एकच अतिक्रमण दिसले काय? असा सवाल बुधवारी मनसेने केला आहे.

ऐन सणासुदीच्या काळात देवस्थान समितीच्या माजी अध्यक्षांनी दिलेली जागा, पर्याय न देता काढून घेतली. उदरनिर्वाहाचे साधन बंद होणार या भीतीने त्या कुटुंबाने केलेल्या विरोधानंतर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा नोंदवला.

देवस्थान समिती अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून एका कुटुंबावर व सामाजिक दृष्ट्या गोरगरिबांच्या, सर्वसामान्य लोकांच्या अडचणीमध्ये धावून जाणाऱ्या मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांचेवर खोटे व बेकायदेशीर गुन्हे नोंद करून कारवाई करणाऱ्या अतिक्रमण पथकाला महाद्वार रोड, ताराबाई रोड, ज्योतिबा रोड आणि मंदिर परिसरातील अन्य मोठी अतिक्रमणे दिसत नाहीत का? अशी विचारणा केली आहे.

नागरिकांनी आणि नगरसेवकांनी अनेकवेळा मागणी करूनही महाद्वार रोड, ताराबाई रोड येथील मोठ्या प्रमाणावर असलेल्या परप्रांतीय दुकानदार,एखाद्या फेरीवाल्यावर कारवाई झाली की फेरीवाला संघटनांचे दुद्धाचार्य नेते आणि काही आर्थिक राजकीय हितसंबंध असलेले माजी नगरसेवक लगेच धावून येत असल्याने त्यांच्यावर कारवाई करायची ताकद अतिक्रमण विभागात नाही.

अतिक्रमण विभाग प्रमुखांनी या भागातील सर्व अतिक्रमणे हटविण्याचे धाडस दाखवावे अन्यथा सभागृहात मागणी केल्याप्रमाणे अतिक्रमण विभाग बंद करण्यासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून मनसे जनाधिकार सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज येडूरे यांनी दिला.

यावेळी प्रशांत माळी, राज मकानदार, बबन सावरे, राहुल कुंभार अमित कोरे, प्रवीण मनुगडे, सौरभ कांबळे, रवी हातकर, अतुल भालकर, संजय पाटील, वैभव सतळे, नागेश चापे, ऋषभ आमते, रिक्सन डिसोजा, पांडुरंग कगरे, प्रवीण माने, प्रमोद पाटील, नयन गायकवाड, अमर वडर, अशोक पाटील, किरण जाधव, संपतराव पाटील, अण्णा टिळवे, किरण पोतदार, गणेश बुचडे, नरेंद्र चिकोडीकर, प्रकाश देसाई, दयानंद भोईटे, ओमकार कोळी, तुषार चिकुर्डेकर, संदीप पताळे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks