सुशीलकुमार शिंदेंची मुलगी, जावयाची मालमत्ता ईडीने केली जप्त

मुंबई प्रतिनिधी –
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रीती श्रॉफ व जावई राज श्रॉफ यांच्या ‘जिंदाल कम्बाईन्स प्रा. लि.’ व ‘ऑरलॅंडो ट्रेडिंग प्रा. लि.’शी संबंधित ३५ कोटी ४८ लाखांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) टाच आणली आहे. ‘एचडीआयएल’चे राकेश वाधवा व सारंग वाधवा बॅंक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने ही कारवाई केली. या मालमत्तेमध्ये अंधेरी येथील कालेंडोनिया इमारतीतील दोन व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्ता प्रत्येकी १० हजार ५५० चौरस फुटाच्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एचडीआयएल प्रकरणातील तपासात येस बॅंकेने २०० कोटी रुपये मॅकस्टार मार्केटिंगला दिले होते, असे निष्पन्न झाले होते. ही रक्कम ज्या कामासाठी घेतली, तिथे न वापरता इतर कामासाठी वापरून व्यवहारात आणल्याचे ‘ईडी’च्या तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी सखोल तपासानंतर या मालमत्तांवर टाच आणण्यात आली. त्यातील एक व्यावसायिक मालमत्ता २०१४ मध्ये ‘जिंदाल कॉम्बाइन्स प्रा. लि.’ला नऊ कोटी ३९ लाख (त्या वेळी रेडिरेकनर मूल्य १५ कोटी ६४ लाख रुपये) आणि २०१६ मध्ये ‘ऑरलॅंडो ट्रेडिंग प्रायव्हेट’ला आणखी एक व्यावसायिक मालमत्ता १८ कोटींना (रेडीरेकनर मूल्य १९ कोटी ८४ लाख) हस्तांतरित करण्यात आली होती, असे ईडी सूत्रांनी सांगितले.
कंपन्यांची मालकी श्रॉफ पतीपत्नीची त्यातील केवळ दुसऱ्या मालमत्तेचे १० कोटी रुपये स्वीकारण्यात आले आहेत. या दोन्ही मालमत्ता कंपन्यांना वर्षाकाठी अनुक्रमे एक कोटी ७६ लाख आणि एक कोटी ३९ लाख रुपये भाडे मिळत आहे. या दोन्ही कंपन्या राज श्रॉफ आणि त्याची पत्नी यांच्या मालकीच्या आहेत. अशा प्रकारे राकेश वाधवा आणि सारंग वाधवा यांनी मॅक स्टार मार्केटिंग प्रा. लि. बहुसंख्य भागधारकांच्या (डीई शॉ ग्रुपमध्ये ८३.६६ टक्के समभाग असलेल्या) संमतीविना वरील मालमत्ता बेकायदा कमी किमतीत विकून मॅक स्टारचे नुकसान केल्याचे ईडी सूत्रांनी सांगितले.