13 हजाराच्या लाच प्रकरणी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास अॅन्टी करप्शनकडून अटक

15 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 13 हजार रूपयाची लाच घेणार्या अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रूपेश प्रताप सिंग ठाकूर (33) असे लाच घेणार्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहती अशी की, यातील तक्रारदार हे भगवंतराव महाकाळ व कनिष्ठ महाविद्यालय मानोली तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथे कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असून त्यांचे वडील नामे प्रल्हाद महादजी महाकाळ यांचे आजारावर भाटिया हॉस्पिटल मुंबई येथे उपचार झालेला असून त्यांचे 3,37,918/-रु. रुपयाचे वैद्यकीय प्रतिपूतीचे बिल मंजूर करून देण्याकरिता वरिष्ठ लिपिक रुपेश ठाकूर, शिक्षण उपसंचालक कार्यालय, अमरावती विभाग हे 15,000 /- रू लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रारदार यांनी सविस्तर तक्रार दिली होती.
सदर तक्रारीवरून दिनांक 21/06/ 2023 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान यातील लोकसेवक रुपेश ठाकूर वय-33 वर्षे, पद-वरिष्ठ लिपिक यांनी तक्रारदार यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती चे बिल मंजूर करून देण्याकरिता तडजोडी अंती 13,000/- रू. लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले व लगेच आयोजित करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान यातील आलोसे रुपेश प्रतापसिंग ठाकूर यांनी तक्रारदार यांच्याकडून 13,000/-रुपये लाचेची रक्कम कक्ष क्रमांक 4 ,माध्यमिक विभाग येथे स्वीकारल्याने आलोसे यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मारूती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे, पोलिस उप अधीक्षक शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेशकुमार दंदे, पोलिस निरीक्षक अमोल कडू, पोलिस अंमलदार नंदकिशोर गुल्हाने, आशिष जांभोळे, शैलेश कडू,चालक पोलिस उपनिरीक्षक सतीश किटुकले, पोलिस हवालदार चंद्रकांत जन्मबंधू यांच्या पथकाने केली आहे.