आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी शासन निर्णयात केलेल्या अमुलाग्र बदलांमुळेच लाखो लाभार्थ्यांना निराधार योजनेचा लाभ : प्रताप उर्फ भैया माने यांची प्रतिपादन ; कागल तालुक्यामधील संजय गांधी योजनेच्या २७३ लाभार्थ्यांना मंजुरीपत

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
विशेष सहाय्य मंत्री असताना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी शासन निर्णयामध्ये केलेल्या अमुलाग्र बदलांमुळेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना लाभ होत आहे, असे प्रतिपादन केडीसीसी बँकेचे संचालक व कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष श्री. प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले. कागल तालुक्यातील मे-२०२३ व जून- २०२३ मध्ये मंजूर केलेल्या २७३ संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना आमदार हसनसो मुश्रीफसाहेब यांचे पत्रवाटप करताना श्री. माने बोलत होते.
भाषणात श्री. माने पुढे म्हणाले, कागल तालुक्यात आमदार हसन मुश्रीफसाहेब यांनी कोणतीही राजकीय अभिलाषा न बाळगता गटा -तटाच्या पलीकडे जावून पात्र संजय गांधी योजना लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिलेला आहे. यापूर्वीही आमदार श्री. मुश्रीफसाहेबांनी ‘शासन आपल्या दारी’ योजना राबवून शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले आहे. आमदार मुश्रीफसाहेब सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खात्याचे मंत्री असताना त्यांनी संजय गांधी निराधार योजनेतील अनेक अडचणी व त्रुटी दूर करून शासन निर्णयामध्ये अमुलाग्र बदल केला. त्यामुळेच आता राज्यामध्ये अनेक पात्र गोरगरीब लाभार्थ्यांना मोठया प्रमाणात या योजनेचा फायदा होत आहे. लवकरच के.डी.सी.सी. बँकेमार्फत संजय गांधी योजनेतील सर्व लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान त्यांना घरपोच देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करून, त्यांनाही लवकरच मंजुरी पत्रे देण्यात येणार आहेत.
यावेळी श्री. शशिकांत खोत, श्री. राजू आमते, श्री. नारायण पाटील, श्री. सदाशिव तुकान, श्री. प्रवीण काळबर, श्री. सुनिल माने, श्री. नवल बोते, श्री. नामदेवराव पाटील, श्री. संजय ठाणेकर, श्री. सुनिल माळी, श्री. सुनिल कदम, श्री. राजू शानेदिवान व मोठया संख्येने लाभार्थी उपस्थीत होते.