मराठा आरक्षणाला नामदार हसन मुश्रीफ यांचा सदैव पाठिंबाच ; राष्ट्रवादीच्या प्रमुखांचे प्रसिद्धी पत्रक

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी मराठा आरक्षणाला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. हे सदैव मराठा समाजासोबतच राहिलेले आहेत. मराठा आरक्षणासाठीच्या सर्वच आंदोलनांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार आहे, असे प्रसिद्धी पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुखांनी प्रसिद्धीला दिले आहे. मराठा समाजाला मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांनी नेहमीच पाठबळ दिलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही त्यांची आग्रही भूमिका त्यांनी अनेकवेळा स्पष्ट केलेली आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, सरचिटणीस बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितल फराकटे, कागलचे नगरसेवक नितीन दिंडे, राष्ट्रवादीचे इचलकरंजीचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे, विनायक फाळके, प्रकाश गवंडी या प्रमुखांच्या सह्या आहेत.
पत्रकात पुढे म्हटले आहे, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार शासकीय झेंडावंदनासाठी १५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी सकल मराठा समाजाच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली. त्या बैठकीमध्ये हा प्रश्न माझ्या एकट्याच्या पातळीवरील नसून यासंदर्भात मुंबईत बैठक लावू , असेही त्यांनी सुचित केले होते. दरम्यानच्या काळात जालना येथे श्री. मनोज जरांगे -पाटील यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आणि त्यांनी उपोषण सुरूही केले. तिथे पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद म्हणून महाराष्ट्रभर मोठा असंतोष निर्माण झाला.
या काळात मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांनी मुंबईमधून उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे ॲड. बाबा इंदुलकर यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे घडवून आणले. त्याच कालावधीमध्ये उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापुरामध्ये दहा सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रवादीची उत्तरदायित्व सभा होती. त्या पार्श्वभूमीवर नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी आठ सप्टेंबर २०२३ सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.
त्यावेळी झालेल्या चर्चेत मंत्री श्री. मुश्रीफसाहेब साहेब यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला सांगितले की, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी दूरध्वनीवरून ॲड. बाबा इंदुलकर यांना सांगितले आहे की, “जालना येथील श्री. मनोज जरांगे -पाटील यांच्या उपोषणामुळे या संदर्भातील बैठक एकट्या उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना बोलविता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच संघटनांची बैठक आयोजित करू.” त्यावेळी कोल्हापुरातील संघटना म्हणून तुम्हाला बोलविण्याची जबाबदारी आमची, असे मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांनी या शिष्टमंडळाला सांगितले होते. त्यामुळे कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे आंदोलन स्थगित झाले.
दरम्यान ; मनोज जरांगे -पाटील यांच्या उपोषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि जालना येथे स्वतः जाऊन त्यांनी श्री. जरांगे-पाटील यांना भेटून आश्वासन दिल्यानंतर त्यांनी १३ सप्टेंबर २०२३ रोजी उपोषण सोडले. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले कि, ४० दिवसात शासनाची व्यापक बैठक आयोजित करू. त्यानुसार शासकीय पातळीवर संशोधन आणि प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान; श्री. जरांगे- पाटील यांचा विषय ज्वलंत बनला म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ती बैठक बोलावली नाही. ही सर्व वस्तुस्थिती आहे. त्यामुळे, कोणीही गैरसमज करून घेऊ नये. ज्यावेळी मुख्यमंत्री मुंबईत ही बैठक बोलावतील त्यावेळी कोल्हापुरातील शिष्टमंडळाला बोलवण्याची जबाबदारी आमची राहील.