कोल्हापूर : पोलिस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हॉट्सॲप मॅसेज व्हायरल,पोलिस वर्तुळात उडाली खळबळ

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
उजळाईवाडी विमानतळाचे सुरक्षा अधिकारी पोलिस निरीक्षक प्रदीप काळे वारणा नदी पुलाजवळ बेशुद्धावस्थेत मिळून आले. त्यांनी झोपेच्या गोळ्या अतिप्रमाणात सेवन केल्याचे वैद्यकीय तपासणीत पुढे आले आहे. वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य करत असल्याचा मेसेज त्यांनी व्हॉट्स ॲप ग्रुपवर पाठविल्यानंतर हे कृत्य केल्याची चर्चा आहे. या प्रकाराने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिस निरीक्षक काळे यापुर्वी पेठवडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून काम करत होते. तिथून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. सध्या उजळाईवाडी विमानतळाचे सुरक्षा अधिकारी म्हणून जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी सकाळी काळे यांनी आत्महत्या करत असल्याचा मेसेज अधिकार्यांच्या ग्रुपवर पाठवला. यामुळे अधिकार्यांसह पोलिसांची धावपळ उडाली. जिल्हा पोलिस प्रमुखांनी मोबाईल लोकेशनवरुन शोध घेण्याच्या सुचना केल्या. यावेळी त्यांचे लोकेशन वारणा नदी पुलाजवळ मिळाले.