कोल्हापूर : जादा परताव्याच्या आमिषाने 2.28 कोटींची फसवणूक ; लक्ष्मीपुरी पोलिसांकडून एकाला अटक

गुंतवणुकीवर दरमहा 13 ते 16 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याच्या बहाण्याने 2 कोटी 28 लाख 63 हजारांना गंडा घालून पसार झालेल्या म्होरक्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. अमोल नंदकुमार परांजपे (वय 40, रा. उत्तरेश्वर पेठ) असे त्याचे नाव आहे. 2019 ते 25 सप्टेंबर 2023 या काळात ही घटना घडली.
संशयित अमोल व त्याची पत्नी नीलम यांनी 2019 मध्ये उत्तरेश्वर पेठमध्ये लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी तीन महिन्यांसाठी मोबाईल रिचार्ज केल्यानंतर एक महिन्याचा फ्री रिचार्ज देण्याची स्कीम सुरू केली होती. त्यास परिसरातील मोबाईल धारकांकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर संशयितांनी शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा 13 ते 16 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखविले.
प्रारंभीच्या काळात अनेक व्यावसायिक, व्यापारी, उद्योजकांसह नोकरदारवर्गातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार पुढे आले. काही काळ नियमित परतावे मिळू लागल्याने गुंतवणूकदारांची गर्दी वाढू लागली. मे 2023 पर्यंत नियमित दरमहा परतावा परांजपे देत होता. त्यानंतर मात्र संशयिताने गाशा गुंडाळून पलायन केले.
अभिषेक आनंदराव पाटील (रा. माळी कॉलनी, टाकाळा) याच्यासह 34 गुंतवणूकदारांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात अमोलसह पत्नी नीलम परांजपेविरुद्ध 2 कोटी 28 लाख 63 हजार 400 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लेखी तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, सुगावा लागत नव्हता. आज सोमवारी सकाळी परांजपेला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. उद्या, मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक अरविंद कवठेकर यांनी सांगितले.