महाराष्ट्र राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

राज्यात अनेक ठिकाणी अद्यापही पावसाने दडी मारल्याने धरणांत 20 टक्के पाणीसाठा राहिला आहे. खरीप हंगामात शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला असून, महाराष्ट्र राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शेतकर्यांना सरसकट 25 हजारांची मदत द्या, विमा कंपन्या, अनुदानाच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. राज्यात आलीबाबा चाळीस चोर होते, आता दो आलीबाबा ऐंशी चोर मिळून राज्यातील टगे सरकार तिजोरी लुटण्याचे काम करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी सांगितले की, मराठवाड्यात सध्या भीषण परिस्थिती असून, यामध्ये खुद्द कृषिमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात तरुण शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत आहे. त्यामुळे आता लोकांना सरकारकडून कुठलीही अपेक्षा राहिलेली नाही. कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर करून बळीराजाला दिलासा देण्याचे काम केले. त्या धर्तीवर दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची मागणी त्यांनी केली. राज्यातील अनावश्यक विकासकामे थांबवून शेतकर्यांना मदत करा, सध्याची कामे होत राहतील. शेतकर्यांचे आयुष्य सरकारला महत्त्वाची नाही का ? असा सवाल त्यांनी केला.