सातबारा उताऱ्यावरील शेरा कमी करण्यासाठी लाच स्वीकारताना महिला तलाठी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

सातबारा उताऱ्यावरील अज्ञान पालक कर्ता (अपाक) शेरा कमी करुन देण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्विकारताना जालना जिल्ह्यातील निकळक येथील महिला तालठी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. रेखा पुरुषोत्तम मानेकर (वय-32 रा. समर्थनगर, जुना जालना) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या महिला तलाठ्याचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि.31) मानेकर यांच्या बदनापुर येथील खासगी कार्यालयात केली.
तक्रारदार यांनी त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील अपाक शेरा कमी करण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यावरुन तलाठी यांनी शेरा कमी न केल्यामुळे तक्रारदार यांनी पुन्हा लेखी अर्ज केला होता. त्यावेळी तलाठी रेखा मानेकर यांनी अपाक शेरा कमी करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जालना एसीबी कार्यालयात तक्रार दिली.
एसीबीच्या पथकाने प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता रेखा मानेकर यांनी तक्रारदार यांच्या सातबारा उताऱ्यावरील अपाक शेरा कमी करण्यासाठी दोन हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचेची रक्कम मानेकर यांच्या बदनापुर शहरातील हुसेननगर येथील खासगी कार्यालयात स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी रेखा मानेकर यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर बदनापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे , अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना एसीबीचे पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे, गजानन घायवट, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे, गणेश बुजाडे, गणेश चेके, ज्ञानदेव जुंबड,गजानन खरात, अतिक तिडके, गजानन कांबळे, शिवलिंग खुळे, संदीपान लहाने, जावेद शेख, विठ्ठल कापसे यांच्या पथकाने केली.