शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही : नारायण राणे

मुंबई :
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल बुधवारी सायंकाळी पार पडला. त्यात भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय राणेंना मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राणेंनी ‘शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही’ म्हणत ठाकरेंवर निशाणा साधला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी म्हटलं की, शरद पवारांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्या. पवार मला म्हणाले की चांगले काम करा. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मात्र मला शुभेच्छांचा फोन आला नाही.
पुढे राणे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्यात या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो. त्याचबरोबर नारायण राणे यांनी आपल्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले.
दरम्यान, देशाचा जीडीपी कसा वाढेल तसंच देशातील तरुणांना रोजगार प्राप्त होण्यासाठी काय करता येईल, याचा मी विचार करेन, असं पदभार स्वीकारल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं.