अजितदादा शरद पवारांमध्ये पुण्यात गुप्त बैठक? महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शनिवारी (दि.12) पुण्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही गुप्त बैठक झाली. शरद पवार आज पुण्यात होते. तसेच चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनासाठी अजित पवार पुण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार-अजित पवार यांच्यात बैठक झाल्याची बातमी माध्यमांनी दिली आहे.
कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या बंगल्यात शरद पवार आणि अजित पवार यांची बैठक होत असल्याचे समजताच पत्रकारांनी बंगल्याबाहेर गर्दी केली. अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली. सुरुवातीला शरद पवार हे बंगल्याबाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने अजित पवारांचा ताफा बंगल्याबाहेर पडला. मागील काही दिवसांपासून शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यातच आज या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
आम्ही आणि साहेब वेगळे नाही, असं वक्तव्य अजित पवारांनी शिरुरमधल्या एका सभेत केलं होतं, त्यानंतरही राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा झाल्या. दरम्यान आजच पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील एकत्र आले होते, पण अजित पवारांनी या कार्यक्रमाला यायचं टाळलं होतं, त्यानंतर आता अजित पवार-शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भाजपसोबत (BJP) मी जाणार नाही अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.
परंतु अजित पवार-शरद पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.एकीकडे शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्राचा दौरा केला जाणार आहे.त्यात येवला येथील सभेनंतर आता शरद पवार बीडमध्ये सभा घेणार आहेत.राष्ट्रवादीकडून शरद पवार यांची ही स्वाभिमान सभा असल्याचे सांगण्यात येत आहे.