ताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशस्वी जीवनाच्या परीक्षेला शॉर्टकट नाही : शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर ; जयसिंगराव घाटगे हायस्कूलमध्ये चित्रकला,वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण.

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना गृहपाठ तर महत्वाचा भाग आहेच शिवाय अवांतर वाचन, मनन, चिंतन याची नितांत गरज आहे.जीवनाच्या परीक्षेला कोणताही शॉर्टकट नाही.त्यामुळे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतल्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन कोल्हापूर जि.प.माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले.

छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या अमृतमहोत्सवी जयंती निमित्त शाहू कला,क्रीडा , सांस्कृतिक मंडळ व श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर, हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धा व आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छ.शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे होत्या.

संगीत मंचच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी चित्रकला आणि वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

श्री. अंबोकर बोलताना म्हणाले,रात्री सात ते नऊ या वेळेत विविध टी.व्ही. वाहिन्यांवरती अत्यंत हॉरर तसेच जीवघेण्या मालिका दाखविल्या जातात. सहाजिकच याचा विपरीत परिणाम या शालेय विद्यार्थ्यांवरती होतो. यापासुन कटाक्षाने पालकांनी सावध राहावे. आधुनिक शिक्षणामध्ये होणारे बदल शिक्षकांनी तत्काळ आत्मसात करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही श्री. अंबोकर यांनी यावेळी केले.

राजमाता जिजाऊ महिला संघटनेच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे बोलताना म्हणाल्या स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांची विद्यार्थ्यांना शालेय जीवनात दर्जेदार शिक्षणासह विद्यार्थी इतर क्षेत्रातही चमकावेत अशी धारणा होती. आज या स्पर्धेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादातून स्व.राजेंचं स्वप्न पूर्ण होत असल्याचे पहावयास मिळत आहे. व्यक्तिमत्व विकास घडण्यासाठी या स्पर्धा महत्त्वपूर्ण असून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना मिळणारी सर्वसमावेशक शिक्षणाची शिदोरी त्यांना आयुष्यभर पुरेल असेही सौ.घाटगे यांनी सांगितले.यावेळी अक्षया रणजीतसिंह बावचे (सातवी), प्रतीक्षा सुरेश येरुडकर (नववी) या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे सचिव व शाहू कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, संचालक यशवंत ऊर्फ बाॅबी माने,सचिन मगदूम, सतिश पाटील, भाऊसाहेब कांबळे,सौ.सुजाता तोरस्कर,टी.जी.आवटे, युवराज पसारे,प्रशासन अधिकारी कर्नल एम.व्ही.वेस्वीकर, मुख्याध्यापिका जे.व्ही.चव्हाण व सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.डी.खोत यांनी केले तर आभार सौ.सुजाता सासमिले यांनी मानले.

अपंगांच्या कर्तुत्वाला बळ देणारा उपक्रम……

या चित्रकला स्पर्धेस मूकबधिर, मतिमंद मुलांचा प्रतिसाद मोठा होता.यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते स्पर्धेतील यशस्वी अपंगांच्या कर्तुत्वाचा गौरव त्यांच्या पालकांसमवेत करण्यात आला.काळजाचा ठाव घेणारा हा सत्कार पाहून उपस्थितांसह वडिलांनाही गहीवरून आले.यावेळी अनेक पालकांनी तर घाटगे हायस्कूलचा हा उपक्रम अपंग विद्यार्थांना बळ देणारा असल्याचे गौरवोद्गार काढले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks