चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून पर्यटनासाठी बंद राहणार ; 15 ऑक्टोबरपासून पुन्हा पर्यटनासाठी खुले होणार

पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेले सांगलीमधील (Sangli) चांदोली राष्ट्रीय उद्यान कालपासून (15 जून) पर्यटकांसाठी बंद झाले आहे. चांदोली परिसरातील चांदोली धरण यापूर्वीच म्हणजे 12 जूनपासून बंद करण्यात आलं आहे. आता चांदोली राष्ट्रीय उद्यानही आजपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटनासाठी बंद राहणार आहे. पावसाळा सुरु झाल्यामुळे हा निर्णय दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस असणार्या आणि पर्यटकांचे माहेरघर म्हणून चांदोली अभयारण्य आणि धरण परिसर समजला जातो. दोन्ही ठिकाणे पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याने पर्यटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन धरण प्रशासन तसेच चांदोली राष्ट्रीय उद्यान कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांच्या वाढत्या पर्यटनामुळे संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आहे. या उद्यानातील पर्यटनासाठी वनविभागाने बससेवा सुरु केल्याने या उद्यानास भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या पाच महिन्यात सुमारे पाच हजार पर्यटकांनी या उद्यानास भेट देऊन येथील निसर्गरम्य पर्यटनाचा आनंद लुटल्याची नोंद या विभागाच्या कार्यालयाकडे झाली आहे. सुट्टीमुळे मे महिन्यात सर्वात जास्त पर्यटकांनी भेट दिली. प्रशासनाकडून दरवर्षी 15 जूनपासुन हे उद्यान पर्यटकांसाठी बंद ठेवले जाते. पावसाळा संपल्यानंतर 15 ऑक्टोबरपासून चांदोली राष्ट्रीय उद्यान पुन्हा पर्यटनासाठी खुले केले जाते.
दुसरीकडे, चांदोली परिसरात पावसाला हळूहळू सुरुवात होऊ लागली आहे. दरवर्षी तीन ते पाच हजार मिलीमीटर येथे पाऊस पडतो. या कालावधीत नैसर्गिक आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळा सुरु झाला की येथील पर्यटन बंद करण्यात येते. चांदोलीला भेट देणाऱ्या पर्यटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलावडे व वारणा प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी केले आहे.