ताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हीएसआय देणार स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाने उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार -समरजितसिंह घाटगे ; स्व.विक्रमसिंह घाटगे यांच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येच्या निर्णयाने कृतीशील श्रद्धांजली

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी सहकारी साखर कारखानदारीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून भागाचा व शेतकऱ्यांचा किती चांगल्या पद्धतीने विकास करता येतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळेच कारखान्याचा देशपातळीवर नावलौकिक झाला. सहकारी साखर कारखान्यातील त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन दरवर्षी साखर उ‌द्योगात तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यास पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने “स्व. राजे विक्रमसिंह घाटगे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार” या राज्य पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

स्व.राजेसाहेबांच्या रविवारी (ता.१३) होणाऱ्या दहाव्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पुरस्काराच्या निर्णयामुळे त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने कृतीशील श्रद्धांजली वाहिली असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

याबाबत माहिती देताना घाटगे पुढे म्हणाले,राज्यातील साखर कारखान्यांची शिखर संस्थाअसलेल्या व्हीएसआयमार्फत साखर उ‌द्योगात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना दरवर्षी बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येते. त्यामध्ये वरील पुरस्काराबाबतच्या ‘शाहू’च्या प्रस्तावास या गळीत हंगामापासून त्यांच्या कार्यकारी समितीने मान्यता दिली आहे. हे शाहू परिवारातील सर्वच घटकांसाठी अभिमानास्पद आहे.

स्व.राजेसाहेब यांनी छत्रपती शाहू साखर कारखान्याची अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थापना केली.कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध नसताना प्रसंगी टँकरने पाणी आणून कारखाना चालविला. १२५० मे.टन गाळप क्षमतेवर सुरू झालेला हा कारखाना आता ८००० मे.टन दैनंदिन गाळप करीत आहे.सहवीज निर्मिती, इथेनॉल,बायोगॅस आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांचीही यशस्वीपणे उभारणी केली आहे.उच्चांकी ऊस दराबरोबर सभासद शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक नवनवीन पायंडे स्व. राजेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू साखर कारखान्याने पाडले. सहकारी साखर कारखानदारीतील त्यांचे कार्य अडचणीत असलेल्या कारखानदारीला आजही दीपस्तंभासारखे आहे.

यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,ज्येष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी मंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

पुरस्कारामुळे इतर कारखान्यांना प्रोत्साहन – श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे : कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या,छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन स्व.राजेसाहेब यांनी सर्वसामान्य शेतकरी,कष्टकरी कामगार यांचे हित यासाठी उभी हयात खर्च केली.त्यांचे जिवंत स्मारक म्हणून हा कारखाना जोपासला. त्याच्या व्यवस्थापन कौशल्यामुळेच कारखान्याचा देशपातळीवर नावलौकिक झाला. त्यांच्या नावाच्या या पुरस्कारामुळे इतर कारखान्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी निश्चितच उपयोग होईल.

स्व.राजेसाहेबांच्या उतुंग कार्यास राज्य पातळीवर उजाळा – जितेंद्र चव्हाण : कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, स्व.राजेसाहेब यांनी कारखान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापराबरोबर संशोधन केंद्रातील अ‌द्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याचा ध्यास सातत्याने घेतला.नवनवीन प्रयोग यशस्वीपणे राबविले.ऊसाला उच्चांकी ऊस दर दिला. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. या पुरस्कारामुळे साखर कारखानदारीतील त्यांच्या उतुंग कार्यास राज्य पातळीवर उजाळा मिळणार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks