कोल्हापूर: कसबा बावड्यातील कचरा प्रकल्पात पोकलँडमध्ये सापडून महिलेचा ह्रदयद्रावक अंत

कोल्हापूर प्रतिनिधी :
लाईन बाजार येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचरा बाजूला करणार्या पोकलँन्ड मशिनमध्ये सापडल्याने मंगल राजेंद्र दावणे (वय ६०, रा. ७०५ ए वॉर्ड, शिवाजी पेठ कोल्हापूर) या महिलेचा ह्रदयद्रावक अंत झाला. तब्बल अडीच तासांच्या शोधानंतर महिलेचे धडापासून वेगळे झालेले शिर सापडले. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लाईन बाजार येथील कोल्हापूर महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. विलगीकरण न झालेला हा कचरा एकत्रित करून नव्याने येणाऱ्या कचऱ्यासाठी जागा करण्याचे काम नेहमीच सुरू असते. या कामासाठी अनंत कन्स्ट्रक्शन या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून कोल्हापूर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या शेडजवळ जुना कचरा बाजूला करण्याचे काम सुरू होते.
सकाळी दहाच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळच सदर महिला कचर्यातील प्लास्टिक आणि बाटल्या गोळा करण्याचे काम करत होती. पोकलँड ड्रायव्हरला ही महिला दिसली नाही. कचऱ्याचे ढीग उचलत असताना महिलेचे शिर पोकलेनच्या बकेट ने धडावेगळे झाले. कचरा बरोबर ते इतरत्र पडले. याचा अंदाज ड्रायव्हरला आला नाही. काम सुरू होते. काही वेळानंतर पोकलँडच्या बकेटमध्ये महिलेचे अडकले धड बकेटबरोबर वरती आले. यावेळी ड्रायव्हरच्या ही बाब लक्षात आली, ड्रायव्हरने काम थांबून अपघाताची माहिती प्रकल्प स्थळावरील महानगरपालिकेच्या मुकादमास दिली.
प्रकल्पस्थळी इतरत्र काम करत असणाऱ्या दुसऱ्या ड्रायव्हरला बोलाऊन त्याच पोकलँडच्या साह्याने महिलेचे शिर कचर्यात शोधणे सुरू झाले, तब्बल अडीच तासानंतर महिलेचे शिर सापडले. दुपारी दीड वाजता मृतदेह शववाहिकेतून सीपीआर रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. दरम्यान पोकलँड चालक चंद्रकांत अर्जून माळवी (वय ३०) रा. सोनुर्ले ता. शाहूवाडी याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. मृत मंगल दावणे यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे