मोठी बातमी : पोलिस दलात 3000 पदांची कंत्राटी भरती ; राज्य सुरक्षा महामंडळाकडून भरणार पदे

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांची 3 हजार पदे रिक्त आहेत. ही पदे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे. ही पदे कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांसाठी असणार आहेत.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांची 40 हजार 623 पदे मंजूर आहेत. त्यापैकी पोलीस शिपाईची 10 हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या दैनंदिन कर्तव्याकरीता मनुष्यबळ अपुरे पडत आहे. 21 जानेवारी 2021 मध्ये आयुक्तालयासाठी 7 हजार 76 पोलीस शिपाई व चालकाचे 994 पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली.
त्याची प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरु आहे. असे असले तरी सुमारे 3 हजार पदे रिक्त राहत आहेत.
तसेच हे अंमलदार हे भरती प्रक्रिया व प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यसाठी 2 वर्षांनंत्तर आयुक्तालयास उपलब्ध होणार आहे. हे लक्षात घेऊन ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किमान 11 महिने कालावधीसाठी 3 हजार पदे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्तांनी केली होती. त्याला शासनाने मान्यता दिली आहे. राज्यातील पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबईसह अनेक जिल्ह्यातील पोलीस दलात मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. अशा प्रकारे मुंबई पोलिसांना मान्यता दिल्याने इतर ठिकाणीही कंत्राटी पद्धतीने पोलीस कर्मचारी भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.