ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश

कोल्हापूर प्रतिनिधी :

ओबीसी आरक्षणाची सुनावणी येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आहे. तिथे काही उलटसुलट निर्णय झाला, तर आपल्याला सवोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जावे लागेल. त्याच्या तयारीला लागा, असा आदेशच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील तपोवन मैदानावर झालेल्या विराट संकल्प सभेत ते बोलत होते.
या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, जयदेव गायकवाड, खासदार अमोल कोल्हे, आमदार अमोल मिटकरी आदींसह मान्यवर नेते उपस्थित होते.

महाराष्ट्रातील, देशातील धार्मिक द्वेषाचे राजकारण रोखण्याचे काम कोल्हापूरने नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत करून दाखविले. जाती-जातींमध्ये भांडणे लावणाऱ्या शक्तींना कोल्हापूरने चपराक लगावली असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. पक्षाने या सभेच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘निर्धार पुरोगामी महाराष्ट्राचा… राष्ट्रवादीला नंबर वन करण्याचा’, अशी भूमिका घेऊनच या पक्षाची आगामी वाटचाल राहील, असे सभेतील सर्वच वक्त्यांनी आवर्जून सांगितले. ‘आवाज कोणाचा… आवाज जनतेचा… दाही दिशांतून घुमला… राष्ट्रवादी पुन्हा…’ अशी आरोळी देऊन पक्षाने जणू जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचेच रणशिंग फुंकल्यासारखे वातावरण सभास्थळी झाले.
या सभेत सर्वच वक्त्यांनी कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या विजयाची नोंद घेतली. तोच धागा पकडून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोल्हापूर ही शाहूंची भूमी आहे. शाहूंचा विचार पुढे नेण्याचे काम कोल्हापूरने करून दाखविले. त्याबद्दल मी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे सतेज पाटील व शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचे अभिनंदन करतो. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात वातावरण गढूळ करण्याचे, द्वेषाचे विष पेरण्याचे काम सुरू आहे; पण हा महाराष्ट्र अशा विचारांना कधीच थारा देणार नाही.

ओबींसी आरक्षणाशिवाय निवडणूक नाही : भुजबळ………..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणूकीची तयारी करण्याचे आदेश दिले तर याच सभेत नेते छगन भुजबळ यांनी मात्र ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय जिल्हा परिषद निवडणूका महाविकास आघाडीचे सरकार होवू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली.

५० हजार देणारच…….

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार उत्तम पद्धतीने काम करत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आमच्या पक्षाने प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला असून, ही रक्कम लवकरच तुमच्या खात्यावर जमा होईल. याशिवाय दोन लाखांवरील कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्जही आम्ही माफ करू.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks