शाहूवाडी : पेंडाखळे वनपरिक्षेत्रात शिकार प्रकरणी चौघांना अटक ; वनविभागाची कारवाई ,आरोपींना एक दिवसाची कोठडी

कळे प्रतिनिधी : अनिल सुतार
पेंडाखळे वनक्षेत्रातील गस्ती पथकाने धोंडेवाडी ता. शाहुवाडी येथील जंगलात शिकार करण्यासाठी गेलेल्या चौघा संशयितांना वनविभागाच्या पथकाने अटक केली त्यातील १) खंडेराव रंगराव मेडशिंगे वय ४६ रा. कसबा ठाणे ता. पन्हाळा,२) मारुती पांडू माटल वय ४५ रा. सोनुर्लेपैकी धोंडेवाडी ता. शाहुवाडी,३) पांडुरंग मारुती पाणबुडे वय ३६ रा. खोतवाडी ता. शाहूवाडी,४) प्रदीप धनाजी साळोखे वय ३४ रा. कोतोली पैकी मानेवाडी ता पन्हाळा अशी शिकार करताना सापडलेल्या संशयितांची नावे आहेत. गुरुवारी पहाटे पकडलेल्या संशयित आरोपींना शुक्रवारी सायंकाळी कळे-खेरिवडे न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना न्यायमूर्ती वैशाली लावंड-कोकाटे यांच्याकडून एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली.
अधिक माहिती अशी की, गुरुवारी पहाटे ५:३० वाजताच्या दरम्यान सोनुर्लेपैकी धोंडेवाडी येथील जंगलात संशयित रित्या चार चाकी गाडी लावल्याचे वनविभाग गस्तीच्या पथकाला आढळले होते. गाडीत चौघांसह दोन बंदुकी आणि सुरी सारखी शस्त्रे सापडल्याने त्यांच्याकडे वनविभागाच्या पथकाने कसून चौकशी केली असता शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात फिरत असल्याचे त्यांनी कबूल केले.
कारवाईनंतर त्यांना पेंडाखळे वनपरिक्षेत्रातील मौसम नर्सरीत चौकशीसाठी ठेवले होते. आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता वन विभागाच्या वतीने सरकारी वकील उदयसिंह जगताप यांनी आपले म्हणणे मांडले, आरोपी शिकारीच्या साहित्यासह मिळून आलेले आहेत त्यांनी शिकार केलेली असेल तर कशाची केली ? नसल्यास शिकारीचा प्रयत्न कोठे केला? इतर कोणी साथीदार आहेत काय? असे म्हणणे मांडून दोन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती तर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आरोपींच्या वकिलांनी, संशयितांनी कोणत्याही प्रकारची शिकार केलेली नाही किंवा त्यांच्याकडे शिकार आढळून आलेली नाही असा युक्तिवाद केला.
या शिकार प्रकरणात एक प्रसिद्ध पैलवान असल्याची चर्चा होती परंतु त्यांचे नाव संशयितामध्ये नव्हते तसेच त्यांच्या गाडीचा वापर करण्यात आल्याची व या प्रकरणात वन विभागाच्या अधिकाऱ्यांंवर दबाव टाकण्यात येत असल्याची तसेच शिकार करणाऱ्या पैकी सुरुवातीला पाच जण असल्याची चर्चा होती. परंतु न्यायालयात चौघांनाच हजर केले यातून नेमके कोणाला वाचवण्यासाठी उशीर केला? याबाबत न्यायालय परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होती पुढील तपास पेंडाखळे वनपरिक्षेत्र वन अधिकारी सुषमा जाधव करत आहेत.



