ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : समृद्धी महामार्गावर अमित ठाकरेंची गाडी अडवल्याने कार्यकर्त्यांकडून तोडफोड

समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. नाशिक-सिन्नरजवळील टोलनाक्याची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. अमित ठाकरेंची गाडी अडवल्याच्या रागातून ही तोडफोड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान अमित ठाकरे टोलनाक्यावरुन निघून गेल्यावर ही तोडफोड झाली आहे. तर वरिष्ठ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

गेल्या तीन दिवसांपासून अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्यांना यावेळी अमित ठाकरे यांनी भेट दिली. तसेच त्यांनी या भागात विविध ठिकाणी सभा देखील घेतल्या. त्यानंतर शनिवारी (22 जुलै) रात्री आपला दौरा आटोपून अमित ठाकरे हे मुंबईच्या दिशेने आपल्या कार्यकर्त्यांबरोबर रवाना झाले होते. समृद्धी महामार्गावरुन त्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता. यावेळी समृद्धी महामार्गावरील सिन्नरजवळील टोलनाक्यावर त्यांना अडवण्यात आलं होतं. त्यांना काही वेळ टोलनाक्यावर थांबवण्यात देखील आलं होतं.

दरम्यान फास्टॅगवरुन काहीतरी गोंधळ झाल्याची प्राथमिक माहित समोर येत आहे. पण त्यानंतर अमित ठाकरे हे टोलनाक्यावरुन निघून गेल्यानंतर मनसेचे नाशिकचे शहराध्यक्ष दिलीप दातीर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी याच रागातून टोलनाक्याची तोडफोड केली आहे. जवळपास सात ते आठ कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर हे कार्यकर्ते टोलनाक्यावरुन निघून गेले. वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल जरी झाले तरी अद्याप याबाबत कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाही. पण पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मनसे टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर समृद्धी टोलनाक्यावर तोडफोड झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

प्रेमापोटी राग अनावर झाला : बाळा नांदगावकर

दरम्यान या प्रकरणावर मनसेचे नेते बाळ नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांचा प्रेमापोटी राग अनावर झाला असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांची पाठराखण केली आहे. तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची माहिती देखील बाळ नांदगावकर यांनी दिली आहे. तर अमित ठाकरे यांच्या गाडीला फास्टॅग आहे, त्यामुळे टोलनाक्यावर कोणतीही अडचण येत नाही असं देखील बाळ नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

अमित ठाकरे यांची गाडी जेव्हा टोलनाक्यावर होती तेव्हा काही तांत्रिक अडचणींमुळे टोलनाक्यावरील खांब वर झाला नाही. त्यामुळे त्यांनी अमित ठाकरे यांना थांबवलं. सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारलं असता कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांना उद्धटपणे उत्तर दिली, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks