कागल : जयसिंगराव तलावातून तीन हजार ट्राॕली गाळ उचलला ; किमान सव्वा कोटी लिटर पाणी जादा साठणार : राजे समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शासनाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत ऐतिहासिक जयसिंगराव तलावातील गाळ काढण्याचे काम आठ दिवसांपासून युद्ध पातळीवर सुरु आहे. आज अखेर तीन हजार ट्रॉली गाळयुक्त माती उचलण्यात आली आहे. आणखी तीन हजार ट्राॕली माती बाहेर काढण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या तलावात सव्वा कोटी लिटर पाणी जादा साठवणूक होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
श्री घाटगे यांच्या पाठबळातून व संकल्पनेतून राज्यात सर्वप्रथम या तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची त्यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
सद्या या ठिकाणी सात जेसीबी मशीन व ऐंशी ट्रॅक्टर-ट्राॕली गाळ उचलण्याचे काम अहोरात्र करीत आहेत. पावसाळ्यापुर्वी जास्तीत जास्त गाळ काढण्याच्या दृष्टीने त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचना संबंधितांना श्री. घाटगे यांनी दिल्या. त्यामुळे उद्यापासून या ठिकाणी बारा जेसीबी मशीन व सव्वाशे ट्रॅक्टर-ट्राॕली गाळ उपसण्याचे काम करणार आहेत.
श्री.घाटगे पुढे म्हणाले, तलावातील गाळ काढण्याच्या या स्तुत्य उपक्रमास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे तलावातील पाणी साठवणूक क्षमता वाढनार असल्याने यापुढे कागलवासियांना पाणीटंचाई भासणार नाही. शिवाय शेतकऱ्यांना जमिनीत पसरण्यासाठी गाळ उपलब्ध झाल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढणार आहे. असा दुहेरी फायदा या उपक्रमामुळे होणार आहे.
वास्तविक लोकप्रतिनिधीं म्हणून कागलवासियांना पाणीटंचाई भासू नये याची जबाबदारी आमदार मुश्रीफ साहेब यांची होती. परंतु कागलच्या नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही.त्यामुळे कागलवासियांसमोर पाणी टंचाईचे संकट आले आहे.मात्र ते अधिकार्यांवर बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहेत.कागलवासियांच्या जिव्हाळ्याच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे आमदार हसन मुश्रीफ यांचे दुर्लक्ष का ? असा सवालही त्यांनी केला.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने,युवराज पाटील, राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, संचालक राजेंद्र जाधव, आप्पासो भोसले, उमेश सावंत, पप्पू कुंभार,पांडुरंग जाधव जल अभियंता विजय पाटील आदी उपस्थित होते.
अस्तरीकरणाच्या कामासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार
दुधगंगा डाव्या कालव्यातून जयसिंगराव तलावात पाणी सोडण्यासाठी 450 मिलिमीटर व्यासाचे पाईपचे गेट कालव्यावर केले आहे. परंतु या गेट पासून तलावात पाणी येण्याचा मार्ग गाळ व मातीने भरला आहे. या ठिकाणी गेट पासून तलाव पर्यंत पाटबंधारे विभागाच्या कालवा विभागाच्या सहकार्याने ही चर नव्याने खुदाई करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर या चरीचे अस्तरीकरण करण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना श्री घाटगे यांनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. एक किलोमीटर अंतराच्या या अस्तरीकरणाच्या कामामुळे गेटपासून पाणी तलावात जलद गतीने व पूर्ण क्षमतेने येणार आहे. पाणी पाझणार नाही. त्यामुळे तलाव लवकर भरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अस्तरीकरणाच्या प्रस्तावासाठी आपण शासकीय पातळीवर पाठपुरावा करू अशी ग्वाही श्री घाटगे यांनी यावेळी दिली. पावसाळ्यापुर्वी जास्तीत जास्त गाळ काढण्याच्या दृष्टीने त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचना संबंधितांना श्री. घाटगे यांनी दिल्या. त्यामुळे उद्यापासून या ठिकाणी बारा जेसीबी मशीन व सव्वाशे ट्रॅक्टर-ट्राॕली गाळ उपसण्याचे काम करणार आहेत.