व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी, खंडणी विरोधी पथकाने सावकारांच्या आवळल्या मुसक्या

दूध डेअरी व्यावसायिक तसेच नोकरदार यांनी पैशांची परतफेड केली असताना आणखी पैशांची मागणी करुन खाजगी सावकारांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या पोलिसांनी अवैध सावकारी करणाऱ्या तीन सावकारांवर खंडणी व सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
यश संजय मेमाणे , मानव संजय मेमाणे (दोघे रा. रविवार पेठ) यांच्यावर खडक पोलिसांनी सावकरी कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी आदेश राजू पवार या दुग्ध व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी राजू पवार यांचा डेअरीचा व्यवसाय आहे. त्यांनी आरोपींकडून 1 लाख 90 हजार रुपये 10 टक्के महिना व्याजाने घेतले होते. आरोपींनी पवार यांचा टेम्पो गहाण ठेवून पैसे दिले होते. फिर्यादी यांनी आरोपींना फोन पे आणि रोख स्वरुपात 1 लाख 71 हजार रुपये व्याज देऊन गहाण ठेवलेला टेम्पो परत मागितला. मात्र आरोपींनी त्यांच्याकडे आणखी 2 लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे न दिल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातील स्मार्ट वॉच जबरदस्तीने काढून घेऊन गेले होते.
होम लोन व मॉर्गेज लोन व्यवसाय सुरु करण्यासाठी शनिवार पेठेत राहणारे प्रसाद अशोक मोटे यांनी खासगी सावकार सुरज मनोज परदेशी (रा. गुजरवाडी, कात्रज) याच्याकडून 45 हजार रुपये 20 टक्के दरमहा व्याजाने घेतले होते. फिर्यादींनी त्या मोबदल्यात परदेशी याला गुगल पे व फोन पे वरुन 4 लाख रुपये ऑनलाईन तर 50 हजार रुपये रोख असे एकूण 4 लाख 50 हजार रुपये दिले होते. पैसे दिले असताना आरोपी परदेशी याने आणखी 1 लाख 53 हजार रुपयांची अवाजवी मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे न दिल्याने त्यांच्या घरी येऊन त्यांना शिवीगाळ करुन बदनामी करण्याची धमकी दिली. याबाबत प्रसाद मोटे यांनी सुरज परदेशी याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी परदेशी विरुद्ध सावकरी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार ,पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक ,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे 2 सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-2 चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे ,पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण , मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार विजय गुरव, सुरेंद्र जगदाळे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे, राहुल उत्तरकर, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, चेतन आपटे, पवन भोसले, किशोर बर्गे, प्रदिप गाडे, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.