महिला सरपंचासह ग्रामविकास अधिकारी लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

केलेल्या पाईप लाईनच्या कामाचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून लाच घेणार्या महिला सरपंचासह ग्रामविकास अधिकार्याला अॅन्टी करप्शनच्या पथकाने मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
रूचिता भालचंद्र पिंपळे (26, पद – सरपंच , गोठेघर ग्रामपंचायत, शहापूर, जि. ठाणे) आणि दिलीप गोविंद इंगळे (51, पद – ग्रामविकास अधिकारी, गोठेघर ग्रामपंचायत, शहापूर, जि. ठाणे) अशी लाच घेणार्या महिला सरपंच आणि ग्रामविकास अधिकार्याचे नाव आहे . याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी गोठेघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत राईस मिल ते चिंतामणी प्लाझा दरम्यान पिण्याच्या पाण्याचे पाईप लाईनचे काम केले होते. केलेल्या कामाचे बिल 1 लाख 23 हजार 175 रूपये मंजूर केल्याचा मोबदला म्हणून सरपंच रूचिता पिंपळे यांनी तक्रारदाराकडे 23 हजार रूपये तर ग्रामविकास अधिकारी दिलीप इंगळे यांनी 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या दि. 27 जून 2023 रोजीच्या पडताळणी कारवाईत ग्रामविकास अधिकारी दिलीप इंगळे यांनी 500 रूपये तर सरपंच रूचिता पिंपळे यांनी 20 हजार रूपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ठाणे अॅन्टी करप्शनच्या युनिटने सापळा रचला असता दोघांनी सरकारी पंचासमक्ष लाच घेतल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे , अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक पल्लवी ढगे-पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.