ताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडीसीसी बँकेला १४७ कोटी ढोबळ नफा ; बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापूर, प्रतिनिधी :

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १४७ कोटी रुपये ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.  ठेवीमध्ये १,३८७ कोटींची वाढ होवून बँकेकडे ७,१२८ कोटी रुपये ठेवी झाल्या आहेत, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यासाठी लवकरच निविदा मागवून विमा योजना सुरू करणार आहोत, असेही ते म्हणाले.      
         
कोल्हापुरात बँकेच्या केंद्र कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री  हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. यावेळी  माजी खासदार श्रीमती निवेदिता माने,  पी. जी. शिंदे, अनिल पाटील, आर. के. पवार, विलासराव गाताडे, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, सर्जेराव पाटील- पेरीडकर,  प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास आदी संचालक व  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.
     
यावेळी श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, सहा वर्षांपूर्वी संचालक मंडळ सत्तेवर आले. त्यावेळी १३१ कोटीचा संचित तोटा व २,८९० कोटी इतक्या ठेवीही कमी होत्या. अशा परिस्थितीत सर्व ग्राहकांनी, शेतकऱ्यांनी, सभासदांनी, संचालक मंडळाने व अधिकारी -कर्मचार्यांनी प्रचंड विश्वास दाखवला.  खर्चात काटकसर व पारदर्शीपणाने कारभार करीत वसुलीसाठी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता काम केल्यानेच बँकेला हे फळ मिळाले आहे. देशात नंबर एक असा या बँकेचा लौकिक वाढवू शकलो व प्रगती करू शकलो, याचा मनापासून आनंद आहे. उद्दिष्टाच्या तब्बल २०८ टक्के पीक कर्ज वाटप करुन ही बँक देशात अव्वल बनली आहे.
        
ते पुढे म्हणाले, या वर्षी ३० कोटी रुपये इन्कम टॅक्स भरावा लागणार होता. परंतु; आयकर कायद्यातील तरतुदीनुसार गुंतवणूकीच्या तरतुदी करून १२ कोटी इन्कम टॅक्स वाचवू शकलो. डिजिटल बँकिंगमध्ये बँकेने १००% प्रगती करून ग्राहकांना हव्या त्या सगळ्या सुविधा देण्याचे काम पूर्ण केले आहे. बँकेच्या सर्व म्हणजे १९१ शाखा नफ्यात असल्याचे सांगतानाच श्री. मुश्रीफ म्हणाले, खेळते भांडवल १,५२३ कोटी रुपयांनी वाढले आहे. निव्वळ एन.पी.ए. फक्त २.२० टक्के व सी.आर.ए.आर. चे प्रमाण १२.२५ टक्के आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी दहा हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट व दोनशे कोटी नफ्याचे उद्दिष्ट आहे, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.

ढोबळ नफ्यातील तरतुदी
१४७ कोटींच्या ढोबळ नफ्यात इन्कम टॅक्स – १८ कोटी, अपात्र कर्जमाफी व्याज तरतूद -१२ कोटी,  कर्मचारी बोनस-  सात कोटी, रजेचा पगार -आठ कोटी, रूरल डेव्हलपमेंट फंड -सहा कोट, एन.पी. ए. -३० कोटी या मुख्य व इतर तरतुदी आहेत.
       

निव्वळ नफा प्रस्तावित विभागणी*
बँकेला झालेल्या ४३ कोटी निव्वळ नफ्यात रिझर्व फंड- अकरा कोटी, शेती पत स्थिरता निधी – साडेसहा कोटी, लाभांश २२ कोटी, सीबीएस फंड -एक कोटी, लाभांश समकरण निधी- एक कोटी व इमारत निधी- एक कोटी अशी संचालक मंडळ सभा शिफारसीने व वार्षिक सर्वसाधारण सभा मंजुरीने प्रस्तावित विभागणी आहे.
        

*बँकेच्या नवीन योजना अशा*

•कोणत्याही कारणाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना विमा भरपाई देण्यासाठी निविदा काढून योजना राबविणार…..
     
•या बँकेकडून शंभर टक्के कर्ज घेणाऱ्या व संपूर्ण ऊसबिल बँकेकडे वर्ग करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तीन लाख रुपयेपर्यंत पीक कर्जात दोन टक्के रिबेट……
       
•पाच लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी म्हणजेच शून्य टक्के व्याजदराने देणार……..
         
•आज पासुनच खावटी कर्ज, ज किसान सहाय्य,  शेती मध्यम मुदत कर्जे, साखर कारखाने व सूतगिरण्याची कर्जे,  सोनेतारण व्‍यक्तिगत कर्ज या कर्जाच्या व्याजदरात कपात……
          
•अपात्र कर्जमाफी रकमेवरील व्याज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत स्थगित व या व्याजाची तरतूद या ढोबळ नफ्यातून……..
       
•व्यक्तिगत कर्ज योजनांमध्ये सोनेतारण कर्ज व सोने कॅश क्रेडिट कर्ज, घर बांधकाम कर्ज, लोन अगेन्स्ट प्रोपर्टी, वाहन कर्ज व टॉप -अप लोन या योजनांमध्ये बँक आघाडी घेणार……
          
•कोविड परिस्थितीमुळे साखर कारखान्यांसाठी बँकेने आत्मनिर्भर कर्ज योजना सुरु केली आहे……

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks