कोल्हापूर : हातात गावठी कट्टा घेऊन इन्स्टाग्राम रीलद्वारे दहशत माजविणार्या तरुणास अटक

हातात गावठी कट्टा घेऊन इन्स्टाग्राम रीलद्वारे दहशत माजविणार्या प्रसाद राजाराम कलकुटकी ऊर्फ आण्णा चेंबुरी (वय 21, रा. तीन बत्ती चौक, दौलतनगर) याला शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या पथकाने अटक केली. प्रसाद कलकुटकीचा आज वाढदिवस होता. या वाढदिवसादिवशीच ‘हॅप्पी बर्थडे डॉन’ असे म्हणून हे रील तयार करण्यात आले होते.
आण्णा चेंबुरी असे टोपण नाव धारण करून दौलतनगर येथील प्रसाद राजाराम कलकुटकी हा तरुण इनस्टाग्राम अकाऊंटवर बेकायदेशीर गावठी कट्टा हातात घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रीलवरून पोलिस उपनिरीक्षक अभिजीत इंगळे, पोलिस कॉन्स्टेबल गौरव चौगुले, रोहित चौगुले, रमजान इनामदार, सुरेश देसाई, यांनी संबंधित तरुणाचा शोध सुरू केला होता. हा तरुण चुनेकर शाळेजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला बेकायदेशीर गावठी कट्टा आढळून आला.
अशा प्रकारची कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.