ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या : गॅस दर वाढीचा परिणाम जनतेतून होतेय दर कमी करण्याची मागणी

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
निसर्गाची हानी होऊ नये व वृक्ष संपदा टिकून राहावी तसेच ग्रामीण भागातील धुराचे लोट कमी होऊन जनता निरोगी राहावी यासाठी सर्वत्र उज्वला गॅस योजनेतून गॅस वाटप करण्यात आले. सुरवातीच्या काळात व गॅसचा दर कमी असल्याने त्याचा वापर सर्रास वाढला. पण सध्या गॅसचा दर नऊशे च्या वर गेल्याने सर्वसामान्य माणसांना आता गॅसचा वापर कठीण जात आहे. महिलांनी पुन्हा चुलीला प्राधान्य दिले असून महिलांच्या नशिबी आता पुन्हा धुराचा त्रास आला आहे.व सर्व सामान्यांचे गॅस कनेक्शन विश्रांती घेत असल्याचे चित्र आहे.
उज्वला गॅस योजनेतून देशात सिलेंडर वितरित करण्यात आलेत.त्यामुळे तळागाळातून या योजनेचे कौतुक होत होते.त्यावेळी दरही कमी होता.आणि महिला वर्गही आनंदित होत्या.परिणामी वेळ आणि श्रम याची बचत झाली. कोरोना काळात मंदावलेली आर्थिक घडी व सद्याचा गॅसचा दर नऊशेच्या वर गेल्याने सर्वसामान्य जनतेला आता गॅस वापरणे बंद करून ही कनेक्शन आता अडगळीचा आधार घेत आहे.
जो हेतू ठेवून ही योजना सुरू केली तो हेतू साध्य होताना दिसत नसून ही योजना भरमसाठ दरवाढीने कुचकामी ठरत असल्याचे सद्यस्थितीला दिसत आहे.लाकडाचा वापर होऊन पुन्हा ग्रामीण भागात धुराचे लोळ पहायला मिळत असून पुन्हा वृक्ष तोडीचे संकट उद्भवू शकते.
एकंदरीत गॅस दरवाढ झाल्याने गॅसचा वापर मर्यादित झाला असून दरवाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.