भारतीय संस्कृतीत अध्यात्माला अनन्यसाधारण महत्त्व : राजे समरजीतसिंह घाटगे ; शिवगड प्रतिष्ठानचा दहावा वर्धापन दिन उत्साहात

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
अध्यात्मिक ज्ञान माणसाला अधोगतीकडे जाण्यापासून रोखते. चांगले आचरण, सदाचार, स्वयंशिस्त, आदर, प्रतिष्ठा इत्यादी चांगले गुण आपल्या जीवनात केवळ अध्यात्मातूनच मिळतात.त्यामूळेच आज भारतीय संस्कृतीत अध्यात्मिक ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे असे गौरवोद्गार शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी केले. मुरगुड येथील शिवगड आध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे देण्यात येणारा यंदाचा शिवगड प्रतिष्ठानचा
“आध्यात्मिक कार्यगौरव पुरस्कार ” आचार्य उदयकुमार सुधाकर घायाळ (पुणे) यांना सन्मानपूर्वक देण्यात आला.यावेळी मागील वर्षी इयत्ता दहावी,बारावी च्या वर्गात सर्वोत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या गुणवंतांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री.घाटगे पुढे म्हणाले , आपल्या आदर्शवत अध्यात्मिक संस्कृतीचा वारसा अखंडपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी या ट्रस्टची स्थापना केली.आजच्या तरुणाईच्या मनात निर्माण झालेला संशय आणि अज्ञानाचा अंधार केवळ आध्यात्मच दूर करू शकते.त्यामुळे अध्यात्मिकता आणि युवा पिढी यांनी एकमेकांमध्ये गुंतण्याची काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संबोधित करताना शिवगड प्रतिष्ठानचे परमपूज्य डॉ. श्रीकृष्ण देशमुख (काका) म्हणाले, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यात्म आणि परमार्थाचे धडे गिरवले जातात. मानवी जीवनामध्ये मोक्ष मिळविण्यासाठी सर्वांची धडपड सुरू असते. मोक्ष प्राप्तीसाठी गुरूंचे महत्त्व मानवी जीवनामध्ये महत्त्वपूर्ण आहे.त्यामुळे श्री गुरूंच्या साधनेतूनच मोक्ष मिळतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी ट्रस्टच्या विश्वस्त छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे ,बाळकृष्ण चौगुले,बाळासो सूर्यवंशी-पाटील,प्रा.विनायक कुलकर्णी ,भक्तगण, युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक ट्रस्टच्या उपाध्यक्षा सौ.स्नेहा विद्याधर महाजन (पुणे) यांनी केले.आभार ह.भ. प. अशोकराव कौलकर यांनी मानले तर पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
स्व.राजेंमुळेच शिवगड ट्रस्टची
ख्याती….यावेळी बोलताना ह.ब.प.मंदाताई गंधे ( अमरावती )म्हणाल्या, या ट्रस्टच्या उभारणीमध्ये स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांचे अनमोल योगदान लाभले आहे . प.पू.डाॅ. श्रीकृष्ण देशमुख (काका) यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिबिरांच्या माध्यमातून या ठिकाणी अध्यात्म, परमार्थाचे महत्त्व पटवून देण्याचे महत्वपूर्ण काम अव्याहतपणे सुरू आहे .त्यामुळेच या ट्रस्टची महती सर्वदूर पसरलेली आहे.आज राजे समरजितसिंह घाटगे यांचेही या उपक्रमाला मिळत असलेले पाठबळ निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.