ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापुर : गडमुडशिंगी गावामध्ये तळ्याच्या काठावर सोन्याची बिस्किटे सापडल्याने एकच खळबळ ; पोलिसांकडून सोनं ताब्यात

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी गावामध्ये तळ्याच्या काठावर लहान मुलांना खेळताना सोन्याची बिस्किटे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तब्बल 24 लाखांचे सोने तळ्याच्या काठावर सापडल्याने भुवया उंचावल्या आहेत. तळ्याच्या काठावर सोने सापडल्याची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी हे सोनं ताब्यात घेतलं आहे. गांधीनगर पोलिस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सोनं सापडूनही यावर अजूनही कोणी मालकी हक्क दाखवलेला नाही. पोलिसांनी या सोन्याच्या बिस्किटांची खातरजमा केली असून ते खरं सोनं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सापडलेल्या पिशवीत 329.400 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट, 10 ग्रॅम वजनाची 4 सोन्याची बिस्किटे तसेच 10 ग्रॅम वजनाची 2 नाणी आणि 5 ग्रॅम वजनाचे एक नाणे असून हे एकूण 394.400 ग्रॅम आहेत. ही सोन्याची बिस्किटे, नाणी कोणाची आहे याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. पोलिसांनी सर्व सोने खरं आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी गांधीनगरमधील एका ज्वेलरी दुकानातून तपासणी केली असता ते सोने खरे असल्याचे सिद्ध झाले.

सोनं नेमकं कसं मिळालं?

सोनं सापडण्याची घटना 16 जुलै रोजीची आहे. गडमुडशिंगीतील तळ्याजवळ सायंकाळी साडे चारच्या सुमारास रोहित विश्वास गडकरी, ऋषिकेश विश्वास गडकरी, चेतन सुभाष गवळी आणि नागेश महेश कांबळे ही लहान मुलं खेळत होती. यावेळी खेळताना त्यांना गवतात प्लास्टिकची पिशवी दिसून आली. त्यांनी ती उघडून पहिली असता त्यामध्ये सोनेरी चौकोनी लहान-मोठी बिस्किटे आणि नाणी मिळाली. त्यांनी ती पिशवी तशीच गावातीलच विश्वास गडकरी यांच्याकडे दिली.

तळ्याकाठी सोन्याची बिस्किटे आणि नाणी सापडल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर गांधीनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी गोपनीय तपास करत विश्वास गडकरी आणि सुभाष गवळी यांचे घर गाठले. यावेळी त्यांच्याकडे चौकशी करताना सोने सापडल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीनंतर पोलिसांनी गडकरी यांच्याकडून सर्व सोनं ताब्यात घेतले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks