रुपाली चाकणकरांच्या फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट , 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बाबत फेसबुक-यूट्यूबवर अश्लील कमेंट करणं सात जणांना भोवलं आहे. अश्लील कमेंट करणाऱ्या 7 जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या नाशिकच्या सभेवेळी सुप्रिया सुळे बोलत असताना 5 जणांकडून रुपाली चाकणकर यांच्याबाबत यूट्यूबवर अश्लील शब्दांचा वापर करत कमेंट केल्या होत्या. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसी 354 ए, 509 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केल आहे.
याबाबत युवराज विलास चव्हाण (वय-31 रा. धायरी) यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे रुपाली चाकणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात काम करतात. तसेच ते सोशल मीडियाचे कामकाज पाहतात. चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, 6 जुलै रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत रुपाली चाकणकर या फेसबुकवर लाईव्ह करत असताना दोघांनी अक्षेपार्ह कमेंट केल्या.
तसेच 8 जुलै रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यंची नाशिक येथे सभा होती.त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे ह्या बोलत असताना त्याचे लाईव्ह प्रक्षेपण एका टिव्ही चॅनलच्या युट्युबवर सुरु होते. त्यावेळी काही जणांनी अश्लील शब्दात कमेंट केल्या. युवराज चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस पुढील तपास करीत आहेत.



