राष्ट्रवादीनेही लढवली शक्कल, जयंत पाटलांचे सर्वात शेवटी मतदान…
सर्व संपर्कात आहेत. मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी अपिल केले आहे. अपिलाचा निर्णय त्यांच्या बाजूने व्हावा, अशी अपेक्षा आहे असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

मुंबई :
भाजपने (BJP) कितीही दावे केले तरी आमची बेरीज बघितली तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
आज राज्यसभेसाठी (Rajyasabha) मतदान होत असून विधानभवनात जात असताना जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. आम्ही तिन्हीही पक्ष एकत्र लढत आहोत. नाराजी कुणाची नाही. सर्व संपर्कात आहेत. मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी अपिल केले आहे. अपिलाचा निर्णय त्यांच्या बाजूने व्हावा, अशी अपेक्षा आहे असेही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.
मतदान कसं होत आहे, याचा अंदाज घेऊन जवळपास सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी शेवटी मतदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसारच मतदानासाठीचे डावपेच आखले गेले आणि मतदान केले गेले. कॉंग्रेसने आपले दोन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे मतदान राखून ठेवले होते, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे मतदान राखून ठेवले होते. त्यांनी सर्वात शेवटी मतदान केले.
आत्ताच्या घडीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांचं मतदान झालं आहे. राष्ट्रवाद कॉंग्रेसच्या ९ आमदारांनी शिवसेनेच्या संजय पवार यांना मतदान केले, तर कॉंग्रेसने आपली पहिल्या पसंतीची २ मते संजय पवार यांच्या पारड्यात टाकली. राष्ट्रवादी समर्थक अपक्ष तीन मतेसुद्धा संजय पवार यांना दिली गेली. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजूनही आपली दोन मते वाढतील, या प्रतीक्षेत आहेत. मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी अपिल केलेले आहे. त्याच्या निकालाची वाट राष्ट्रवादीचे नेते बघत आहेत.
विधानभवन मुंबई येथे दुपारी २ वाजेपर्यंत २८१ आमदारांनी मतदान केलेले आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी जितेंद्र आव्हाडांप्रमाणे नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली आहे. या दोन्ही मुद्द्य़ांवर भाजपने हरकत घेतली आहे. ही दोन्ही मते बाद करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. पण ही दोन्ही मते ग्राह्य धरण्यात आलेली आहेत.