मुरगूडच्या स्वाती शिंदेची युरोपच्या राष्ट्रकूल स्पर्धेसाठी निवड

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील कुस्तीगीर कु. स्वाती संजय शिंदेची युरोपच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ५३ किलो वजन गटामध्ये भारतीय संघात निवड झाली. उत्तर प्रदेशातील अयोध्यामधील गोंडा येथे झालेल्या २४ व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत स्वातीने महाराष्ट्राला महिला संघात एकमेव रौप्यपदक प्राप्त करून दिले. त्यामुळे तिचे आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तिकीट बुक झाले.
जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित लोकनेते सदाशिवराव मंडलिक साई कुस्ती संकुल आणि जिंदाल ग्रुपची दत्तक स्वाती शिंदेने राष्ट्रीय स्पर्धेच्या लढतीमध्ये ओडिसाच्या क्रश्मीला भारंदाज डावावर १०-०० गुणाने हरवत झंझावती प्रारंभ केला. दुसऱ्या फेरीत हरियाणाच्या निशाला दुहेरी पट काढून सहज चीत केले. तिसऱ्या फेरीत उत्तर प्रदेशच्या दीक्षा तोमरला मोळी डावावर १०- ०० या गुण फरकाने एकतर्फी आगेकूच करीत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
मध्यप्रदेशच्या नेहा जाटला ०८-०४ गुण फरकाने हरवले. आणि फायनलमध्ये प्रवेश केला. स्वाती शिंदे हिची दिल्लीच्या पूजा घेलावत बरोबर चुरशीची झुंज झाली. या चिवट लढतीमध्ये १०-०८ अशा गुण फरकाने स्वातीला हार पत्करावी लागली तरी ती रौप्यपदकाची मानकरी ठरली. आणि युरोपच्या राष्ट्रकूल स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
स्वातीला एनआयएस कोच दादा लवटे, वस्ताद सुखदेव येरुडकर, दयानंद खतकर, सागर देसाई यांचे मार्गदर्शन तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद पुणे, कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, अॅड. वीरेंद्र मंडलिक, साईचे राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण यांचे प्रोत्साहन मिळाले.