मुरगुड गुलमोहरच्या कमानीने जागल्या अजितदादांच्या आठवणी..!

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष कै. अजितसिंह वि. पाटील (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे पंधरा वर्षापूर्वी येथील ज्ञानेश्वर कॉलनीत गुलमोहर व कडुलिंबाच्या वृक्षांचे रोपन करण्यात आले होते. आज या रोपट्यांचे वृक्षात रूपांतर झाले आहे. सद्या हे वृक्ष फुलांनी बहरले असून मुरगूड शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. या वृक्षांच्या रूपाने दादांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे.

कै. अजितसिंह वि. पाटील यांचा आज दि. 23 मे रोजी स्मृतिदिन आहे. त्यांच्या आठवणी या गुलमोहर झाडांच्या रूपाने कायमच मुरगूड वासियांच्या आठवणीत राहतील. सध्या ज्ञानेश्वर कॉलनी म्हटलं की, गुलमोहरची कमानच आपल्या पहिल्या नजरेत पडते.
सुमारे पंधरा वर्षापूर्वी अजितदादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील उद्योगपती मोहन गुजर, युवराज पाटील यांनी या रोपट्यांचे रोपन केले होते. तर मुरगूड नगरपालिकेचे कर्मचारी भैरवनाथ कुंभार यांनी या झाडाचे संगोपन केले. आज हीच झाडे अतिशय सुंदररित्या फुलांनी बहरली असून अजितसिंह पाटील (दादा) यांच्या स्मृती चिरंतर ठेवून ज्ञानेश्वर कॉलनीची शोभा वाढवत आहेत.