ताज्या बातम्या
स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श तरुणांनी समजावून घ्यावा : साहित्यिक संजय खोचारे

बिद्री प्रतिनिधी :
आपल्या प्राणाची तमा न बाळगता आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवून देश स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगण्याची लढाई तरुणांनी समजावून घेणे आवश्यक आहे ; असे प्रतिपादन साहित्यिक संजय खोचारे यांनी केले.
बोरवडे विद्यालय बोरवडे (ता. कागल) या विद्यालयात आयोजित केलेल्या क्रांती दिनानिमित्त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव साताप्पा साठे होते. अन्नपूर्णा साखर कारखान्याचे संचालक आनंदराव साठे, राष्ट्रीय क्रीडा समालोचक सुनील घोडके, बाळासाहेब वारके प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुरगुड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर म्हणाले, आजच्या तरुणांनी क्रांतिकारकांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःची ओळख निर्माण करावी. माता आणि मातृभूमीची प्रेम जोपासत क्रांतिकारकांच्या शौर्याचा अभिमान बाळगून वाटचाल करावी.
यावेळी मुख्याध्यापक ए. आर. वारके, ई.डी. घोरपडे, डी.डी. चौगले, पी.डी. वारके, एस.डी. बचाटे,आर.पी. वारके, मनीषा घोरपडे,गीता बलुगडे, रेश्मा देवर्डेकर, कीर्ती साळुंखे, राधिका शिंदे, श्रीधर कांबळे, विलास कांबळे, कृष्णात साठे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
आर.पी. वारके यांनी प्रास्ताविक केले. कीर्ती साळुंखे यांनी आभार मानले.