मुरगुड : अंबाबाई मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूडचे ग्रामदैवत अंबाबाई मंदिर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरवासीयांनी हजारो दिवे लावून मंदिर उजळवून टाकले. अंबाबाई मंदिर येथे दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी नवीन हेमाडपंथी शैलीच्या मंदिरामध्ये साजरा करण्यात आलेल्या या दीपोत्सवामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी खुलून गेले होते. संध्याकाळी मंदिर व परिसराची स्वच्छता करून मंदिरामध्ये आकर्षक रांगोळ्या काढून त्याच्यावर दिवे ठेवण्यात आले होते. संपूर्ण मंदिर व मंदिर परिसरामध्ये दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती.
हेमाडपंथी रचनेमुळे मंदिराच्या विविध दगडी नक्षीकामावरती दिवे ठेवल्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून गेले होते. दीपोत्सवानंतर आरती झाल्यानंतर नागरिकांनी अंबाबाई मातेचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. या दीपोत्सवाचे संयोजन आनंद गुरव, अभिजित गुरव, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, जगदीश गुरव, महादेव गोंधळी, अनिकेत सुतार, आकाश डेळेकर, मयूर सावर्डेकर, सूरज सातवेकर, स्वप्निल गुरव, केतन मगदूम यांनी केले.