आमदार चंद्रकांत जाधव यांनी महापूरामुळे निर्माण झालेल्या परस्थिती आणि नुकसानीबाबत घेतली महानगरपालिकेची आढावा बैठक.

कोल्हापुर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, पुराच्या पाण्याने अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत, तेथील दुरुस्ती तातडीने हाती घ्या, पाणी पुरवठा लवकर सुरु करा अशा सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिल्या.
पूरग्रस्त भागातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, यांच्या अनुषंगाने बैठकीत तपशीलवार आढावा घेण्यात आला.
कोल्हापूर शहरातील ज्या भागात पूराचे पाणी शिरले. त्या भागात साथ रोग पसरू नये म्हणून काळजी घेण्यासाठी, त्याभागाची त्वरित स्वच्छता करून घ्या. किटकनाशक औषधांची फवारणी व धुराची फवारणी करून घ्या अशा सूचना दिल्या.
पूराचे पाणी ओसरेल तसे स्वच्छता सुरू असून, अनेक भागातील स्वच्छता व औषध फवारणी झाल्याची माहिती मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी दिली.
नागदेववाडी जल उपसा केंद्र उद्यापर्यंत सुरू होणार असून, सोमवारपर्यंत शिंगणापूर जल उपसा केंद्र सुरू होईल. त्यानंतर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती प्रशासक डॉ. बलकवडे यांनी दिली.
शहरातील अनेक भागात ड्रेनेजचे पाणी आले होते, त्याचे पाहणी करून, पुन्हा अशी परिस्थिती होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करा अशीही सूचना यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली.
पूराचा फटका बसलेल्या सर्वच नागरिक, व्यापारी, व्यावसायीकांची माहिती एकत्र करा. नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत आणि भरपाई व मदतीचे प्रस्ताव तयार करून, त्यांना राज्य आणि केंद्राच्या कोण-कोणत्या योजनांमधून सवलत देता येईल, मदत करता येईल त्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याची सूचना दिली.
जे पूरग्रस्त नागरिक स्थलातंरीत झाले आहेत, ते परतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करून घेण्याचीही सूचना यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली.
याप्रसंगी, आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, रवीकांत आडसुळे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, नारायण भोसले, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, अरूण गवळी, शिल्पा दरेकर, विनायक औंधकर आदी उपस्थित होते.