गणेशचतुर्थी सणानिमीत्त इ.९ वी च्या पार्थ मुसळेने शाळेच्या फळ्यावर साकारला सुंदर गणराया

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सारी मुले गणपती बाप्पाच्या आगमनात दंग होती . फटाके, नाचगाणे आणि गणपती बाप्पा मोरया – मंगल मुर्ती मोरयाच्या तालात गुंग होती. तर दूरवर कुठे तरी डॉल्बीवर “आमच्या पप्पांनी गणपती आणला. ” हे गीत वाजत होते . आणि पप्पांनी नाही , तर मी स्वतःच गणपती आणायच्या तयारीत होता. इ .९ वीत शिकणारा पार्थ . तो स्वतः फळ्यावर रंगीत खडूने गणपती बापांना आपल्या कलेतून साकारणार होता . गणरायाचे असे आगमन घडवणार होता .
येथील शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमिक विभागात इयत्ता ९वी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. पार्थ संदिप मुसळे यांने शाळेच्या व्हरांड्यातील नोटीस बोर्डवर रंगीत खडूने रेखाटन करण्यास सुरुवात केली. प्रारंभी सर्व विद्यार्थी – शिक्षक जाता येता पहात होते . अन निघून जात होते . पण हळूहळू पार्थच्या हाताची किमया त्या फळावर प्रमाणबद्ध आकृती आणि सुंदर रंगभरण यातून एक जीवंतपणा दर्शविणारे गणरायाचे आकर्षक पोस्टर आकार घेवू लागले . आणि जाता – येता पहाणाऱ्यांचे पाय एका जागी स्थीरावू लागले . दोन ते अडीच तासाच्या कालावधीत पार्थने एक सुंदर आकर्षक आणि प्रमाणबद्ध असे श्री गणेशाचे पोस्टर रंगीत खडूंच्या माध्यमातून साकारले . आणि पहाण्यांची शाब्बासकी आणि वाहवा मिळविली .
कु पार्थ इ .९ वी मध्ये शिकत असून त्याचे वडील श्री संदीप शामराव मुसळे हे याच शाळेत कलाध्यापक म्हणून सेवेत आहेत चित्रकार , शिल्पकार , लेखक , छायाचित्रकार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या वडीलांच्या सहवासात पार्थवर कलेचे संस्कार होत गेले आणि लहानगा पार्थ कलाप्रेमी बनला . इ. ५ वी पासून त्याने रेखाटलेली चित्रे खरोखरीच वाखावण्या सारखी आहेत . एखाद्या कसलेल्या जाणकार कलाकाराप्रमाणे पार्थचे हात चित्र माध्यमांना हाताळू लागले की त्यातून एक सुंदर कलाकृती साकारली म्हणून समजायचे . आपल्या वडीलांकडील कलेचा हा वारसा अगदी निसर्गतः पार्थमध्ये उतरलेला असून त्याने साकारले गणपतीबाप्पा चे हे पोस्टर कौतुकाचा विषय तर आहेच पण त्याच्यात भविष्यकाळातील एक नामवंत कलाकार लपला आहे हे सांगून जाते आहे.