शरद पवारांसोबतची बैठक आणि तिसरी आघाडी; प्रशांत किशोर यांचा मोठा खुलासा

दिल्ली प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात सोमवारी दिल्लीत दुसऱ्यांदा बैठक पार पडली. या बैठकांवरुन राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. शरद पवार आणि प्रशांत किशोर तिसरी आघाडी तयार करत आहेत का? अशा चर्चा सुरु झाल्या. या सगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलं असताना स्वत: प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्यासोबतची बैठक आणि तिसरी आघाडी याबाबत मोठं विधान केलं आहे. सत्तेत असणाऱ्यांना तिसरी किंवा चौथी आघाडी काही आव्हान निर्माण करु शकते असं मला वाटत नाही, असं प्रशांत किशोर म्हणाले. तसंच, शरद पवार यांच्यासोबत काय चर्चा झाली याची माहिती देखील दिली.
शरद पवार यांच्यासोबत केलेल्या चर्चेनंतर प्रशांत किशोर यांनी एनडीटिव्हीशी बोलताना अनेक खुलासे केले. देशात तिसरी आघाडी हा फार जुना प्रयोग आहे. हा प्रयोग सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये फारसा प्रभावी ठरणार नाही. तसंच तिसऱ्या आघाडीबद्दल चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि मी भेटलो नव्हतो असंही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं. यामुळे तिसऱअया आघडीच्या चर्चेतली हवा प्रशांत किशोर यांनी काढली. परंतु, प्रशांत किशोर यांनी भाजप सावध होऊ नये म्हणून देखील अशी माहिती दिली असण्याची शक्यता कमी होत नाही.