मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

मुंबई
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. त्यातच भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यालाही कोरोनाने विळखा घातला आहे. सचिन तेंडूलकरने स्वतः ट्विट करत याबद्दची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. मला सौम्य लक्षण दिसल्यानंतर मी स्वतः जाऊन कोरोनाची चाचणी करून घेतली आहे. माझी चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. तर बाकी घरच्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. मी स्वतःला घरीच क्वारंटाईन केलं आणि डाॅक्टरांच्या सल्याप्रमाणे सर्व खबरदारी घेत आहे, असं ट्विट सचिनने काही दिवसांपूर्वी केलं होतं.
कोरोना पाॅझिटिव्ह आल्यानंतर सचिन तेंडूलकरने आज ट्विट करत सांगितलं की, वैद्यकीय सल्ल्यानुसार मी खबरदारी म्हणून रूग्णालयात दाखल होत आहे. सचिनने ट्विट करत सांगितलं आहे की, ‘माझ्या तब्येतीसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात आणि लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा देत आहात त्यासाठी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. वैद्यकीय सल्ल्यानुसार मी रूग्णालयात दाखल होत आहे. मला आशा आहे की काही दिवसांत मी घरी परतेन. सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित रहा’.
सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाल्यानंतर जगभरातील त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे. तसंच त्याची तब्येत लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, अशा मनोकामना व्यक्त केली आहे. आजच्या ट्विटच्या माध्यमातून सचिनने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस खास आहे. 10 वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी टीम इंडियानं महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली क्रिकेट विश्वचषकावर पुन्हा एकदा, तब्बल 28 वर्षानंतर आपलं नाव कोरलं होतं. याच दिवसाचं औचित्य साधत त्यानं आपल्या सर्व सहकाऱ्यांच अभिनंदन केलं आहे. ‘सर्व भारतीय आणि संघातील सर्व सहकाऱ्यांचं विश्वचषक विजयाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन’, असही सचिननं आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे.