मराठा विद्यार्थी व तरुणांनी आरक्षणासाठी संघटित व्हावे राजे समरजितसिंह घाटगे मराठा विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार

कोल्हापूर / प्रतिनिधी :
मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या परंतु नियुक्ती रखडलेल्या विद्यार्थ्यांसह प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आरक्षण मिळविण्यासाठी संघटित व्हावे.त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार आहे. अशी ग्वाही आरक्षणाचे जनक राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज, शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा दिलेल्या व प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आम्हा मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा.अशी आग्रही विनंती श्री.घाटगे यांना केली . यावेळी मराठा विद्यार्थी परिषदेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन श्री घाटगे यांना देण्यात आले.
यावेळी श्री.घाटगे यांनी कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचा मराठा आरक्षणसाठी दौरा करणार असल्याचेही स्पष्ट केले.
श्री. घाटगे पुढे म्हणाले , मराठा आरक्षण मिळण्यास किती वेळ लागेल. याची निश्चितता नाही.तोवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा देणाऱ्या उपाय योजना राज्य सरकारने तातडीने करण्याची गरज आहे. ज्यांची निवड झाली आहे. आणि नियुक्ती रखडली आहे.त्यांना तातडीने नियुक्तीपत्रे राज्य शासनाने द्यावीत. तसेच अकरावी-बारावीसह मेडिकल, इंजिनिअरिंग अशा विविध ठिकाणी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीची तरतूदही राज्य शासनाने करावी .शिवाय सारथी व अण्णासाहेब पाटील महामंडळसाठी पूर्वीप्रमाणे आर्थिक सहाय्य करावे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आता त्यांची संघटना तयार करून राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करावेत. त्यासाठी राजकारणापलीकडे मराठा समाजाचा घटक म्हणून मी त्यांच्यासोबत ठामपणे उभा आहे. अशी ग्वाहीही घाटगे यांनी दिली.
यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने साईनाथ पाटील, रणजित जौंधाळ, विवेकानंद पाटील,विश्वंभर भोपळे, स्वप्नील पवार, सुनील दळवी, विशाल पाटील, प्रा. पवन पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
सारथीचे उपकार्यालय कोल्हापुरात व्हावे
मराठा समाजातील विद्यार्थी व तरुणांना दिलासा देण्यासाठीच्या सारथीचे कार्यालय पुण्यामध्ये आहे. त्या ठिकाणी सुविधांची वानवा आहे. त्यामुळे मराठा समाजाची हेळसांड होत आहे. त्यासाठी आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी असलेल्या कोल्हापूर येथे त्याचे मुख्य कार्यालय किंवा उपकार्यालय व्हावे. या ठिकाणी त्यासाठी आवश्यक त्या संपूर्ण सुविधा असून त्यामुळे मराठा समाजास निश्चितच फायदा होईल अशीही भावना एका विद्यार्थ्याने व्यक्त केली.