मंडलिक महाविद्यालयाच्या एनसीसी व पर्यावरण संसाधन विभागाच्या वतीने मुरगुड ते दाजीपूर अभयारण्य येथील शिवगड पदभ्रमंती मोहीम फत्ते

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड (ता.कागल) येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या एनसीसी व पर्यावरण संसाधन केंद्र (इ आर सी) विभागाच्या वतीने मुरगुड ते दाजीपूर अभयारण्य येथील शिवगड पदभ्रमंती मोहीम फत्ते करण्यात आली. यामध्ये 46 मुली व 44 मुले व 6 प्राध्यापक व 1 मार्गदर्शक अशा एकूण 97 जणांनी सहभाग घेतला. दाजीपूर-शिवगड-गगनगिरी मठ असा तब्बल सोळा किलोमीटरचा खडतर आणि थरारक प्रवास अवघ्या चार तासात पूर्ण केला. महाविद्यालयातील एनसीसी चे लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान इआरसी व भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. दादासाहेब सरदेसाई अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉक्टर के. एस. पवार व प्रा. स्वप्निल मेंडके आणि राज्यशास्त्र विभागाचे प्रा. सुशांत पाटील यांनी सहभाग घेतला. तर महाविद्यालयाचेच माजी विद्यार्थी श्री. संदीप मोहिते यांनी पदभ्रमंतीसाठी उत्तम मार्गदर्शन केले. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री. राहुल पाटील, श्री. विकास डोंगळे आणि आकाश डोंगळे यांनी सर्वांना शिवगडचा इतिहास सांगितला व शिवगड ते गगनगिरी मठ पदभ्रमंतीसाठी मार्गदर्शन केले. संपूर्ण पदभ्रमंतीमध्ये बीए भाग 1 ची कु. भूमिका पटेल हिचे कौतुक होत होते. कारण पदभ्रमंतीच्या सुरुवातीसच तिचे सॅंडल तुटल्याने पाठीवर आवश्यक सामानाची सॅग घेऊन संपूर्ण पदभ्रमंती तिने अनवाणी पायांनी पूर्ण केली. यानंतर पदभ्रमंती दरम्यान ब्लाइंड ट्रेकिंग नावाचा थकवा घालवणारा मनोरंजक एक खेळ घेण्यात आला. याद्वारे श्री.संदीप मोहिते यांनी सर्वांना मरणोत्तर नेत्रदान व देहदानाचे महत्त्व सांगून त्यासाठी आवाहन केले. गगनगिरी मठ येथे स्नेहभोजन व संपूर्ण पदभ्रमंतीची सांगता करण्यात आली. यामध्ये लेफ्टनंट प्रा. प्रधान यांनी सर्वांचे आभार मानले.