‘त्या’ व्हायरल व्हिडिओमागील सत्य काय? पीपीई किटधारकांनी दोघांना उचलून ॲम्बुलन्समध्ये कोंबले! लक्ष्मीपुरी पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी केला खुलासा

रोहन भिऊंगडे / कोल्हापूर :
महापालिकेसमोरील माळकर तिकटी…. वेळ दुपारची… पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त…. दुचाकीस्वारांना अडवून चौकशी सुरु…. इतक्यात एक रुग्णवाहिका आली. पीपीई कीट घातलेले चौघे त्यातून उतरले. दोघा दुचाकीस्वारांना उचलून थेट रुग्णवाहिकेतून घेवून गेले. सोशल मिडीयावर या व्हीडीओने बुधवारी धुमाकूळ घातला. उलटसुलट चर्चांना उधाण आले असतानाच, एका सामाजिक संस्थेकडून प्रबोधनात्मक डॉक्युमेन्ट्री बनविण्यासाठी हे प्रात्यक्षिक झाल्याचे समोर आले.पोलिसांकडून 16 ते 23 मे कालावधीत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद असून रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांवर कारवाई केली जात आहे. मार्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्यांवरही कारवाई होत आहेत. अशातच दुचाकीस्वारांना पीपीई कीटधारकांनी थेट उचलून नेल्याचा व्हीडीओ बुधवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाला. माळकर तिकटी येथील या व्हीडीओबाबत अनेक पोलिस अधिकार्यांनाही माहिती नव्हती. तर अशी कारवाई सुरु असल्याने बाहेर पडू नका असे सल्लेही अनेकांनी व्हॉटसॲप ग्रुपवर देण्याला सुरुवात केली होती.
शहरातील एक सामाजिक संस्था लोकांचे प्रबोधन व पोलिसांना सहकार्य करण्याच्या हेतूने एक डॉक्युमेंट्री बनवित आहे. बुधवारी या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी याचे चित्रीकरण माळकर तिकटी येथे घेतले. यामध्ये विनाकारण फिराल, तर उचलून कोविड सेंटरमध्ये दाखल करु असे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण नेमके याचवेळी त्यांच्या अजानतेपणे कोणीतरी चित्रीकरण करुन ते सोशल मिडीयावर व्हायरल केले. यामुळे शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. याबाबत पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी स्पष्टीकरण देवून गैरसमज दूर केले.