माजी आमदार सत्यजित पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान महाविकास आघाडीनेच केला; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण

कोल्हापूर प्रतिनिधी :
शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील- सरूडकर यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान महाविकास आघाडीनेच केला आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या एका पत्रकात हे स्पष्टीकरण केले आहे
या पत्रकात मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, सव्वा वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलांमध्ये माजी आमदार सत्यजित पाटील यांचे प्रमुख सहकारी श्री. हंबीरराव पाटील – भेडसगावकर यांची जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम व आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी या महत्त्वाच्या पदावर निवड करून महाविकास आघाडीने त्यांचा सन्मान केला आहे. शिवसैनिकांनी कृपया गैरसमज करून घेत कोणाच्यातरी चिथावणीला बळी पडू नये. तसेच, माजी आमदार सत्यजित पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांचे गैरसमज दूर केले जातील.
पत्रकात पुढे म्हटले आहे, शिवसैनिकांना माझा सवाल आहे की, गोकुळ दूध संघातील सत्तारूढ आघाडीला भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याप्रमाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीरही केले आहे. दरम्यान; महाराष्ट्रात अनेक प्रश्नावर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर भाजप टीका करत असून शासनाला अस्थीर व बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांच्या मांडीला मांडी लावून आपण कसे बसणार? तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजपचा अध्यक्ष व जनसुराज्य पक्षाचे उपाध्यक्ष झाले. त्यावेळी शाहूवाडी तालुक्यातील शिवसेनेने विनाअट पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक; त्यावेळी हे प्रश्न विचारले गेले पाहिजे होते.
आता आपण कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम दूध उत्पादकांच्या हितासाठी महाविकास आघाडी स्थापन केली आहे. या संदर्भातील सर्वांचेच सर्व ते गैरसमज दूर केले जातील, असेही श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे.