राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन महाराष्ट्र दौऱ्याला केली सुरुवात : खासदार संभाजीराजे

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
27 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करणार असल्याचं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं होतं. एकदा मी पाय पुढे टाकला की मागे घेणार नाही. 27 तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करणार आहे. या सगळ्यानंतर मी माझी भूमिका मांडेन तेव्हा मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशारा संभाजी राजेंनी दिला होता. यातच आता त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात केली आहे.
आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेण्यासाठी खासदार संभाजी राजे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून सामान्य माणसांची मते राज्य सरकार व केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
या दौऱ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील जास्तीतजास्त लोकांना भेटून ते लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. कोल्हापूरातील समाजातील प्रतिनिधींशी संभाजीराजे यांनी चर्चा केली आहे. कोल्हापूरनंतर ते पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, नांदेड असा दौरा करणार आहेत.
दरम्यान, कोल्हापूरातील इतर समाजातील प्रतिनिधींनी देखील या प्रसंगी उपस्थित राहून मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या सर्वांचा मराठा समाजाच्या वतीने मी अत्यंत ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे.